गेल्या वर्षभरापासून थैमान मांडून बसलेल्या कोरोनामुळे जवळ-जवळ सर्वच गोष्टी बंद आहेत. शाळा, महाविद्यालयेही याला अपवाद नाहीत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा (खास करून ग्रामीण भागातील) प्रश्न खूपच चिंताजनक बनत चालला आहे. ऑनलाइन शिक्षण हा पर्याय जरी उपलब्ध असला तरी तो शहरी भागापुरताच मर्यादित आहे कारण अति-दुर्गम व डोंगराळ भाग असल्यामुळे मोबाईल नेटवर्कला असंख्य अडचणी येत आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचं कसं होणार या विचारातूनचं जन्म झाला “ अभ्यासाचे गाव ” या संकल्पनेचा.
एक आगळी वेगळी संकल्पना
भोर तालुक्यातील म्हाळवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रामदास पाटील, राजेंद्र थोरवत व गणेश बोरसे यांना आपल्या शाळेतील मुलांच्या शिक्षणाचं कसं होणार याची चिंता सतावत होती. या सर्व शिक्षक मंडळींनी “ मुलांच्या अभ्यासाचं काय ? ” या विषयावर चर्चा करून “ अभ्यासाचे गाव ” ही संकल्पना सुरू करण्याचा निर्धार केला आणि लगेचच ही संकल्पना गावातील सर्व लोकांसमोर मांडली.
“ अभ्यासाचे गाव ” ही संकल्पना म्हणजे गावातील सर्व घरांच्या आणि सार्वजनिक ठिकाणांच्या भिंतींवर शालेय अभ्यासातील मजकूर लिहिणे ज्याच्यामध्ये भिंतींवर मुळाक्षरे, पाढे, गणिताची सूत्रे, इंग्रजी शब्द, शास्त्रीय संज्ञा, मराठी व इंग्रजी महीने, सुविचार, इ. गोष्टींचा समावेश होतो. भिंतींवर रेखाटलेल्या या सर्व गोष्टी गावात इकडे तिकडे फिरत असताना मुलांच्या नजरे समोरून खूप वेळा जातात व त्यामुळे मुलांचा हसत-खेळत अभ्यास होतो.
एकी हेच बळ
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षकांनी मांडलेली “ अभ्यासाचे गाव ” ही संकल्पना गावातील ग्रामस्थ व तरुणांना खुपचं आवडली. तसेच सरपंच दत्तात्रय बोडके यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन या संकल्पनेचं कौतुक केलं. बघता बघता “ अभ्यासाचे गाव ” ही संकल्पना अस्तित्त्वात आली. गावातीलचं चित्रकार संदीप बोडके यांच्या मेहनतीतून ही कलाकृती रेखाटलेली आहे. गावात इकडे तिकडे फिरत असताना गावातील घरांच्या भिंती जसं काही आपल्याशी बोलतचं आहेत असा भास होतो. आपल्या मुलांचा गावात इकडे तिकडे फिरत असताना हसत-खेळत अभ्यास सुरू आहे त्यामुळे मुलांच्या अभ्यासात आता अडथळा निर्माण होणार नाही याचं गावकर्यांच्या चेहर्यावर एक वेगळचं समाधान पहायला मिळालं.
“ अभ्यासाचे गाव ” या संकल्पनेला गावातील तरुण राजेश बोडके व सायबेज या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच्या संचालिका रितू नथानी यांचे अर्थसहाय्य मिळाल्याचे केंद्रप्रमुख धनाजी नाझीरकरांनी सांगितले. “ अभ्यासाचे गाव ” या उपक्रमाचे गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनावणे यांनी देखील कौतुक केले असून या उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व गावकर्यांचे व प्राथमिक शिक्षकांचे अभिनंदन केले.
मुलांच्या शिक्षणासाठी “ अभ्यासाचे गाव ” ही संकल्पना राबवणार्या सर्व शिक्षकांचे “ आपली मायबोली ” कडून मनापासून अभिनंदन व भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
Comment here