कोकण हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर उभं राहतं एक चित्र ते म्हणजे चंद्रकोरीसारखा डोंगर उतार, त्यावर असलेलं हिरवं जंगल आणि त्यातून डोकावणारी कौलारू घरं उतार संपतो तिथं लगेचच चालू होते नारळांची रांग. अधून-मधून समुद्र किनार्यावर डोकावणारी झाडी आणि दूरवर पसरलेली शुभ्र रेती. कानावर पडते ती समुद्राची गाज आणि सर्वांग लपेटून घेणारा वारा. मन अगदी प्रसन्न होते. असा हा शांत, निवांत अनुभव घ्यायचा असेल तर चिपळूण जवळील वेळणेश्वर समुद्रकिनारा नक्कीच अनुभवायला हवा.
डोळ्यांचं पारणं फेडणारा अविस्मरणीय प्रवास
समुद्रकिनार्यावरचा एखादा विकेंड तुम्हाला नक्कीच ताजंतवाने करेल. पुण्याहून सातारा रोडनं निघायचे आणि उंब्रज या गावी उजवीकडे कोयनानगर रोडला वळायचं. रस्ता अतिशय उत्तम आहे. जसजसं आपण पाटण जवळ जातो, तसतशी झाडी वाढू लागते. हिरवा रंग आणि लाल मातीची सोबत सुरू होते. पुणे ते कोयनानगर अंतर 190 किलोमीटर आहे. डोंगराची ऊंची वाढू लागते आणि कोयनानगर पार केल्यावर आपण पोहचतो कुंभार्ली घाटात. खोल दर्या, घनदाट जंगल मन मोहून टाकणारा निसर्ग आपले लक्ष वेधून घेतात. चहा भज्यांवर मस्त ताव मारत थंड वारा अंगावर घ्यायचा आणि वळणावळणाच्या रस्त्यानं कोकणात निघायचं. फोटोग्राफीची आवड असणार्यांसाठी अनेक उत्तम जागा प्रत्येक वळणावर दिसतात. सकाळी सकाळी गेलो तर डोंगर माथ्यावर तरंगणारं धुकं देखील दिसतं.
चिपळूण जवळ येतं. पोटभर खाऊन आपण पुढे निघतो. हिरवी झाडी वाढू लागते, सर्वत्र लाल लाल माती आणि जांभ्या दगडांची कौलारू घरं आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय रहात नाहीत. भात शेती आणि नारळांची झाडी आपण कोकणात आलो आहोत याची आठवण करून देतात. काही वेळात समोर येतो मोडका आगार फाटा. इथे पोहचल्यानंतर डावीकडे वळायचं आणि तिथून 16 किलोमीटरवर येतं वेळणेश्वर. जांभ्या दगडाच्या सड्यावरून जाताना गार हवा सुरू होते आणि समोर दिसतो तो निळाशार समुद्र. आता कधी एकदा पाण्यात पाय बुडवतो, असं वाटू लागतं. आपण पुन्हा एकदा झाडीत घुसतो आणि वळणावळणाच्या उतारावरून वेळणेश्वरच्या शिवालयासमोर पोहचतो. शांत मंदिर आणि मागेच समुद्रकिनारा पाहिल्यावर मन प्रसन्न होऊन जातं.
इथे आसपास राहण्यासाठी बजेट रिसॉर्टस खूप आहेत. तिथून निसर्गाचा देखावा खूप सुंदर दिसतो. वेळणेश्वरची खासियत म्हणजे समुद्र किनार्यजवळची खडकांची रांग, डोंगरात समुद्र घुसल्यानं त्याची झीज होऊन निर्माण झालेले वेगवेगळे आकार आणि त्यावर समुद्री जीवांनी केलेली नक्षी. दगडावरील जाळ्यांची नक्षी आणि शिंपले सुंदरच दिसतात. किनार्याच्या कोपर्यावर डोंगरातून एक नदी समुद्राला मिळते. छोटीशीच पण सुंदर अशी ती नदी वळसे घेत येते. आसपास माडबन, वाड्या आणि जांभ्या दगडांचं कुंपण खूपच मोहक दिसतं.
नैसर्गिक वैभव लाभलेला वेळणेश्वर किनारा
समुद्र गरुड, ब्राह्मीणी घार आणि अनेक समुद्र पक्षी समुद्रावर घिरट्या घालतात, होड्यांवर बसलेले दिसतात. नशीब जर चांगलं असेल तर किनार्याजवळ डॉल्फिन्स देखील पाण्यातून उड्या मारताना दिसतात. जवळच पलीकडे कारोळ भाटी हे मासेमारांचं गाव आहे. अतिशय सुंदर असा चंद्रकोरी किनारा लाभलेलं हे गाव खास करून फोटोग्राफीसाठी पर्वणीच आहे. इथे दिवस कसा जातो ते कळतचं नाही. आरामात सफर करण्यासाठी हाती दोन-तीन दिवस असतील तर उत्तमच.
कोकणातील खाद्यपदार्थ सुप्रसिद्ध आहेतचं, त्याचबरोबर स्वादिष्ट, चवदार आणि रुचकर पण आहेत. मासेमारांसोबत बोटीतून समुद्रात जाणे हे देखील थ्रील आहे. इथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे. ज्यांना निवांतपणा हवा असेल त्यांनी इथे आवर्जून यावं, आसपास भटकावं किंवा नारळाच्या सावलीत किनार्यावर मस्त झोपावं. किनाराही पोहण्यासाठी चांगला आहे तरी पण स्थानिकांना विचारावं.
जाण्यासाठीचा मार्ग
पुणे – सातारा रोड – उंब्रज – पाटण – कुंभार्ली घाट – चिपळूण – मोडका आगार – वेळणेश्वर
काय पहाल ?
वेळणेश्वर समुद्र किनारा, शिव मंदिर, कारोळ भाटी किनारा, तवसाल समुद्र किनारा, हेदवी समुद्र किनारा, नयनरम्य निसर्ग देखावा.
– योगेश कर्डिले
Comment here