त्वचा ही शरीरावरील सर्वांत मोठा घटक आहे व ती शरीरातील हृदय, फुफ्फुस ज्याप्रमाणे महत्त्वाचे कार्य करतात त्याप्रमाणे त्वचाही करते. त्वचेची जाडी २ एमएम एवढी असते. त्वचा ही बाह्य आघातापासून शरीराचे रक्षण करते. शरीराचे तापमान समतोल ठेवणे, हवेतील सूक्ष्म जीवजंतूपासून रक्षण करणे अशा प्रकारची महत्त्वाची कामे त्वचा करते.
आपली त्वचा म्हणजे आपल्या भावनांचे तापमानसुद्धा आहे. आपले लाजणे, रागावणे याच्या खुणा लगेच त्वचेवर दिसतात. हातापायांचे तळवे, कोपरे, गुडघे इ. भागावरील त्वचा टवटवीत व टणक असते. गळा, चेहरा, ओठ, ज्ञानेंद्रिये इ. भागावरील त्वचा मऊ व मुलायम असते.
त्वचेची रचना समजून घेऊ
त्वचेची घडण दोन थरापासून बनलेली असते. सर्वांत बाह्य थराला प्रतित्वचा म्हणतात. सद्ग्रंथी व धर्मग्रंथीद्वारे या थरातून बनतात. या टणक व द्रव्याच्या पेशी या थरात उघडतात. या पेशीच्या प्रभावामुळे काळा किंवा गोरा रंग दिसतो. सूर्याच्या प्रखर किरणापासून संरक्षण होणे हे पेशींचे कार्य असते.
शरीरातील हार्मोन्स पण त्वचा निरोगी व निर्दोष करतात. त्वचा प्रामुख्याने बाह्यत्वचा, मध्यत्वचा, अंतर्त्वचा या वेगवेगळ्या थरांनी बनलेली असते. या सर्व पेशी निर्दोष असतात. त्वचेचा रुक्षपणा वाढला किंवा तिच्यावर थर वाढला तर तिची जाडी वाढते. यालाच आपण सुरकुत्या म्हणतो.
त्वचेचे प्रकार खालीलप्रमाणे पडतात
१) कोरडी त्वचा :
जागरण, अपचन, तापामुळे त्वचा कोरडी पडते. कोरडी त्वचा असल्यास स्क्रीन फ्रेशनरचा उपयोग करावा. रात्री नरीशिंग क्रीम लावावे. तसेच क्लिन्सिंग क्रीमने चेहरा स्वच्छ करावा. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हार्मोन्स क्रीम वापरावी. चेहरा धुण्याकरिता हार्ड साबण वापरू नये. सॉफ्ट साबण वापरावा. उदा. ग्लिसरीनयुक्त साबण, पिअर्स.
कोरड्या त्वचेच्या तेलग्रंथी कमी प्रमाणात तेल उत्पादन करत असल्यामुळे जरी या प्रकारची त्वचा सुंदर दिसत असली तरी जसजसे वयोमान वाढत जाते त्याचप्रमाणे त्वचेला स्निग्ध पुरवठा कमी होत जातो. त्वचा रुक्ष दिसू लागते. कोरड्या त्वचेसाठी त्वचेच्या आंतर्बाह्य थरांना तेलाचा व स्निग्ध पदार्थांचा पुरवठा चालू केला पाहिजे.
२) तेलकट त्वचा :
तेलकट त्वचा ही कोरड्या त्वचेपेक्षा केव्हाही चांगली असते. कारण वाढत्या वयामुळे तेलग्रंथीची तेलपुरवठा करण्याची क्षमता कमी होत जाते. त्या वेळेस याचा उपयोग होतो. तेलकट त्वचेचा चेहरा तेलकट दिसतो व त्वचेची छिद्रे मोठी असतात. त्वचा जास्त तेल निर्माण करत असल्याने वातावरणातील धूळ, धूर, घाण चेहऱ्यावर आकर्षिली जाते व ती त्वचेच्या छिद्रात अडकते. यालाच आपण ब्लॅक हेड म्हणतो.
त्यामुळे रंध्रे बुजली जातात. त्यातील जंतूंचे इन्फेक्शन होऊन स्वेद ग्रंथीद्वारे नलिका बुजतात. यालाच आपण पिंपल्स म्हणतो. या पिंपल्सला दुर्लक्ष केले असता किंवा नखांनी फोडल्यास हे इन्फेक्शन खोलवर जाऊन स्वेदग्रंथी सुजतात व चेहरा विद्रूप होतो. याला ॲक्ने म्हणतात. असे झाल्यास खोल व्रणाच्या खुणा दीर्घकाळ टिकतात.
अशा त्वचेस शक्यतो औषधी साबणाचा वापर करणे उपयोगी ठरते. शिवाय ज्या स्त्रियांना खूप मुरमे येतात त्यांनी कमी स्निग्ध पदार्थ खावेत व जास्त पालेभाज्या व मोड आलेली धान्य खावीत. तसेच साय, लोणी, तूप इ. कुठलेही क्रीम चेहऱ्याला लावल्यावर त्याची काही ॲलर्जी त्वचेवर होत नाही हे पाहावे. कारण बऱ्याच वेळेस अशा त्वचेवर साधी सुवासाची पावडर वापरली तरीही मुरमे येतात. त्यामुळे अशा त्वचेची जास्त काळजी घ्यावी.
३) मिश्र त्वचा:
अशा प्रकारची त्वचा तेलकट म्हणून समजली जाते. कारण संपूर्ण चेहरा कोरडा असून फक्त काही भागावरच पिंपल्स येतात. पण इतर त्वचा कोरडी राहते. या त्वचेची काळजी घेताना उन्हाळ्यात तेलकट त्वचेप्रमाणे व हिवाळ्यात कोरड्या त्वचेप्रमाणे काळजी घ्यावी.
कोरडी त्वचा तरुणपणी वरदान असते. तेलकट त्वचेचा मुख्य दोष म्हणजे या त्वचेची छिद्रे मोठी होत जातात. त्यातूनच मुरमे निर्माण होतात. तेलकट त्वचेचा एक फायदाही आहे. तो म्हणजे तिशी उलटल्यावरही अशा त्वचेवर सुरकुत्या पडण्याची भीती कमी असते.
त्वचा कोणत्याही प्रकारची असो, काळजी घेणं महत्वाचे आहे
स्त्रिचा रंग कोणताही असो पण त्वचा नितळे पाहिजे. आठवड्यातून एकदा चेहरा क्लिंजिंग मिल्कने स्वच्छ केलाच पाहिजे. त्वचेवरील सुरकुत्या व निर्जीवपणा, जाडपणा, टणकपणा कसा घालवावा हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावे व त्यानुसार त्वचेची काळजी घ्यावी.
– निशिगंधा चोळके