आरोग्यपाककृती

उन्हाळ्यात थकवा दूर करणारे पाच सोप्पे सरबत

Simple Syrups to beat Summer Fatigue | Aapli Mayboli

उन्हाळा सुरू झाला आहे आणि उष्णता आता हळूहळू वाढत आहे. उन्हात जीवाची अगदी काहिली होते. घरी असो किंवा बाहेर उष्णतेने जीव नकोस होतो व सारखी तहान देखील लागते. उन्हाळ्यातच शरीराला पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा नाही झाला की डिहायड्रेशनचा त्रास सुरू होतो मग सुरू होतात डॉक्टरच्या वाऱ्या, ऍडमिट होणं, औषध, ORS चे पाणी वगैरे वगैरे. पण हे सगळं होण्याअगोदरच आपण थोडी काळजी घेतली तर… उन्हाळ्यात शरीराला जशी पाण्याची आवश्यकता असते तशी इतर पेयांची देखील गरज असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

बाहेरचे सतत कोल्ड्रिंक्स व थंड पदार्थ खाऊन शरीराला अपाय होण्याची भीती असते त्यापेक्षा काही सोपी पण आरोग्यदायी शीत पेये, सरबत घरच्या घरी बनवू शकता जी शरीराला फायदेशीर ठरतील. उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारी व थंडावा देणारी काही खास आगळी वेगळी सरबत या लेखात बघूया :-

१) बडीशेप सरबत

एक वाटी बडीशेप, एक वाटी साखर, पाच ते सहा वेलदोडे, चवीपुरते काळे मीठ हे सगळं साहित्य मिक्सर मधून बारीक करून हे प्रीमिक्स हवा बंद डब्यात साठवून ठेऊ शकता. सरबत करायचा असेल त्यावेळी एक ग्लास मध्ये एक चमचा भिजवून घेतलेला सब्जा, थोडी पुदिना पावडर, एक चमचा वरील त्यात केलेले बडीशेप प्रिमिक्स आणि लिंबू पिळून मिक्स करणे.

थंड बर्फाचें तुकडे टाकून, आवडत असल्यास वरून गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट करून थंडगार बडीशेप सरबत सर्व्ह करणे. बडीशेप सरबत उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवून देतो तसेच शरीरातील उष्णता कमी करते. गॅस, पोटदुखी, अपचन अशा समस्या दूर करते. (टीप : या सरबत साठी सब्जा आधी भिजवून ठेवणे)

२) गूळ सरबत

पूर्वीच्या काळी घरी आलेल्या पाहुण्यांना गूळ पाणी द्यायची पद्धत होती त्याचा उद्देश इतकाच की प्रवासाने थकलेल्या जीवांचा थकवा दूर व्हावा, उर्मी मिळावी. त्याचप्रमाणे गूळ सरबत कोणत्याही ऋतूत गुणकारी आहे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन एनर्जी मिळते. बनवायला सोप्पी व आरोग्यदायी रेसिपी नक्की करून पाहा.

गूळ सरबत थंड पाण्यात विरघळावा. (काही वेळ आधीच पाण्यात टाकून ठेवावा किंवा गूळ पावडर वापरावी). आवडीप्रमाणे त्यात लिंबू, सैंधव मीठ, आल्याचा रस घालून मिक्स करून त्यात हवे असल्यास बर्फाचे तुकडे टाकून सर्व्ह करावे. शरीरास उत्कृष्ट व चविष्ट असा हा गूळ सरबत केव्हाही करू शकता.

३) पेरू सरबत

उन्हाळ्यात पेरू खूप मिळतात. मुलांना रोज खायला आवडत नसतील तर पेरूची सरबत केल्यावर नक्कीच ते आवडीने पितील तसेच हा सरबत साठवून ठेऊ शकता जेणेकरून जेव्हा पाहिजे तेव्हा त्यात फक्त थंड पाणी मिसळून सर्व्ह करू शकता.

साधारण अर्धा किलो पेरू स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून पातेल्यात घ्याव्या. फोडी बुडतील इतपत पाणी टाकून १५ ते २० मिनिटे फोडी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे.शिजवून थंड होऊ द्यावे. यातील पाणी बाजूला काढून ठेवावे. (हेच पाणी नंतर वापरू शकता). आता फोडी, ४०० ग्रॅम साखर, चवीनुसार काळे मीठ, सैंधव मीठ, सायट्रिक ऍसिड (१/२ चमचा ) ,जिरे पूड, मिरे पूड, अर्धा इंच आले इत्यादी साहित्य मिक्सर मध्ये छान बारीक करावे.

हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यावे म्हणजे पेरुचे बी बाजूला होईल. आता हे घट्ट पेरुचे मिश्रण तुम्ही एका बाटलीत साठवून फ्रीज मध्ये ठेऊ शकता. जेव्हा सरबत करायचा असेल तेव्हा हे मिश्रण, गरजेनुसार पाणी ( एक ग्लास पाणी – २ चमचे पेरुचे मिश्रण ) बर्फाचे तुकडे टाकून छान मिसळून सर्व्ह करू शकता. यावर पुदिन्याची पाने देखील टाकू शकता. पेरू सरबत पौष्टिक तर आहेच व उन्हाळ्यात फ्रेश देखील ठेवते. लहान मुलांना बाहेरून खेळून आल्यावर, शाळेतून आल्यावर पटकन बनवून दिला की त्यांचा मूडही फ्रेश होऊन जाईल.

४) कैरी सरबत

हा सरबत अगदी झटपट होणारा व जास्त दिवस टिकणारा आहे. यात कैरी शिजवूज वगैरे घेण्याची काही गरज नाही. शक्यतो यासाठी तोतापुरी कैऱ्या घ्याव्यात. २ कैऱ्यांची साल काढून बारीक फोडी कराव्यात. मिक्सरमध्ये या फोडी, अंदाजाने साखर, काळे मीठ, सैंधव मीठ, जिरे पूड, सायट्रिक ऍसिड ( अर्धा चमचा) एकजीव करून पेस्ट करून घेणे. ही पेस्ट थोडे पाणी घालून गाळून घेणे . गाळून घ्यावे घेतलेल्या मिश्रणात चवीप्रमाणे मीठ व पाणी घालणे. तयार सरबत बाटलीमध्ये साठवून फ्रीज मध्ये ठेवणे. जेव्हा हवा असेल तेव्हा फक्त एका ग्लास मध्ये घेऊन त्यात बर्फाचे तुकडे ( गरज असेल तर ) टाकून सरबत सर्व्ह करावा. हा सरबत झटपट होतो व चवीला उत्कृष्ट लागतो.

५) चिंच सरबत

उन्हामुळे किती पाणी पिणे तरी तहान जात नाही व अशक्तपणा आल्यासारखे वाटते अशा वेळी हा चिंच सरबत उत्तम आहे. गोड आंबट चवीमुळे तोंडाला चवही येते व ताजेतवाने वाटते. या सरबत साठी एक वाट चिंच पाण्यात भिजवत ठेऊन त्याचा कोळ काढून घ्यावा. या कोळा मध्ये चिंचेच्या दुप्पट गूळ घालून एकजीव करून घेणे. या मिश्रणात सैंधव मीठ, काळे मीठ ( अंदाजाने ) , जिरेपूड , चिमूटभर सुंठ पावडर, वेलची पावडर टाकून अंदाजाने दाट सरबत होईल इतपत थंड पाणी घालून सगळे मिक्स करून घेणे. ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे टाकून सरबत सर्व्ह करावा. चिंच सरबत मुळे सतत तहान लागणे कमी होते, घशाला कोरड पडत नाही. पोट साफ होते. डायबेटीस रुग्णानी गुळा ऐवजी खजुराचा वापर करावा.

तर असे हे झटपट पटकन होणारे सरबत या उन्हाळयात नक्की करून बघा. घरी येणाऱ्या पाहुण्यांना नेहमीच्या लिंबू सरबत पेक्षा, कोल्ड्रिंक्स पेक्षा हे पौष्टिक व थकवा दूर करणारे सरबत नक्की द्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here