प्रेरणादायी

साधी राहणी उच्च विचारसरणी – सुधा मूर्ती विशेष लेख

Simple Living High Thinking - Sudha Murty | Aapli Mayboli

साधे सरळ एका चाकोरीतले जगणे जगणारे अनेक जण भेटतील पण सुखाची सरळ वाट सोडून वेगळी वाट चोखंदळून त्यात विशेष कामगिरी करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे हातावर मोजण्याइतपतच असतात. स्वतःची प्रगती करून समाजाचेही आपण काही देणे लागतो या भावनेने आपले आयुष्य समाजासाठी वाहणे, साधी सरळ जीवनशैली अंगिकारून आपल्या बुद्धीचा, आपल्या गुणवत्तेचा, संपत्तीचा कोणताही अहंकार न बाळगता केवळ देत राहणे या एका उद्दिष्टाने आपले आयुष्य समाजासाठी वाहिलेल्या व्यक्ती जगासाठी प्रेरणादायी असतात.

त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, कृतीतून नेहमी एक सकारात्मक प्रेरणा मिळत असते त्यातूनही ती व्यक्ती स्त्री / महिला असेल तर समाजाने आखून दिलेली तथाकथित चौकट मोडून स्वतःच विश्व निर्माण करणे, स्वतःच आदर्श व्यक्तिमत्व प्रस्थापित करणे हे खरंच वाखाणण्याजोगे असते. अशाच एका हरहुन्नरी, कर्तबगार, उच्चशिक्षित स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ती प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे सुधा मूर्ती. साधी राहणी उच्च विचारसरणी ही उक्ती रोज जगणाऱ्या, जगवणाऱ्या, इतरांच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या, सर्वांच्या आदर्श म्हणजे सुधा मूर्ती (sudha murthy information in marathi).

सुधा नारायण मूर्ती – जन्म व शिक्षण

सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटक मध्ये शिरगाव गावी १० ऑगस्ट १९५० रोजी झाला. सुधा मूर्तींची आई विमला कुलकर्णी शाळेत शिक्षिका होत्या व वडील आर. एच. कुलकर्णी हे डॉक्टर तसेच प्रोफेसर होते. त्यांचे आजोबाही त्या काळात भरपूर शिकलेले होते त्यामुळे सुधा ताईंच्या घरी शैक्षणिक वातावरण होत. मुलगी आहे म्हणून शिकली नाहीस तरी चालेल पण घरकाम वगैरे आलंच पाहिजे किंवा लवकर लग्न झालंच पाहिजे या विचारांना त्यांच्या घरात मुळीच थारा नव्हता त्यामुळे सुधा ताई लहानपणापासून शैक्षणिक, शिस्तबद्ध, पुरोगामी विचारांच्या जडणघडणीत वाढल्या.

महाराष्ट्रातील कुरुंदवाड मध्ये सुधा ताईंचं बालपण  गेले. तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण मराठीतूनच झाल्यामुळे मराठी भाषेचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झालेत व पुढे त्यांनी ते जपलेही. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या मुलीने शिक्षिका किंवा डॉक्टर किंवा एखाद्या विषयात पी. एच. डी करावी अशी सर्वसामान्यां प्रमाणे सुधा ताईंच्याही घरच्यांची इच्छा होती पण सुधा ताईंच्या मनात इंजिनिअरिंग करण्याचं पक्के होतं. त्या काळी मुली फार फार तर शिकून शिक्षिका व्हायच्या, डॉक्टरही कमीच पण इंजिनिअर तर नाहीच. पण सुधा ताईंना इंजिनिअरिंग करून त्यातच पुढे करिअर करायचं होतं.

आपल्या मुलीचं आगळंवेगळं ध्येय पाहून तिचा हिरमोड न करता त्यांचे आई वडील खंबीरपणे पाठीशी उभे राहिले व सुधा ताईंनी इंजिनिअरिंगला हुबळी येथे KLE Technological University मध्ये प्रवेश घेतला. त्याकाळी सुधा मूर्ती या इंजिनिअरिंग करणाऱ्या त्यांच्या University मध्ये एकमेव महिला होत्या. एकमेव मुलगी म्हणून अनेक अडचणी त्यांना शिक्षण घेताना आल्या पण सगळ्यांचा सामना करून इंजिनिअरिंग यशस्वीपणे पूर्ण तर केलेच पण त्यात प्रथम क्रमांक पटकावून कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. देवराज उर्स यांच्या कडून सुवर्णपदकही मिळवले.

इतक्या वरच न थांबता पुढे त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून कॉम्पुटर सायन्स मध्ये मास्टर डिग्री घेतली व त्यातही अव्वल नंबर मिळवून सुवर्णपदक पटकावले. ज्या काळात महिलांनी लिहिण्या वाचण्यापूरत शिकावं व पुढे घरसंसार सांभाळावा अशी विचारसरणी होती त्या काळात सुधा मूर्ती यांनी मास्टर्स डिग्री घेऊन मुलींपुढे नवीन आदर्श उभा केला होता.

सुधा मूर्ती – नोकरी / करिअर , लग्न

इंजिनिअरिंग मधून मास्टर्स केल्यानंतर शांत बसतील त्या सुधा मूर्ती कसल्या. आता इतक्या तळमळीने शिकल्यावर त्याच चीज करणं हे आलंच. अभियांत्रिकीच शिक्षण घेतल्यावर नोकरी साठी त्या पुण्यात आल्या. प्रसिद्ध जे आर डी टाटा यांना पत्र लिहून टेल्को मधील पुरुष स्त्री भेदभावा वर त्यांनी स्वतःची स्पष्ट व क्रांतिकारी मतं मांडली होती व त्यानंतर टेल्को मध्ये पहिल्या महिला अभियंता म्हणून नोकरीवर रुजू कशा झाल्या याबद्दल सर्वांना माहीत आहेच.

इतक्या मोठ्या कंपनी मालकाला पत्र लिहून असे मत मांडणे यासाठी धडाडी व हिंमत लागते ती सुधा ताईंकडे उपजतच होती. जे चूक आहे ते चूकच आहे हे दाखवण्याची धमक त्यांच्यात होती. पुण्यातील टेल्को कंपनी मध्ये यशस्वीपणे काम करतानाच त्यांची ओळख नारायण मूर्ती यांच्याशी झाली. ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीत व पुढे प्रेमात झालं व सुधा कुलकर्णी या सुधा नारायण मूर्ती झाल्या.

नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस कंपनी सुरू करण्यासाठी नोकरी सोडली तेव्हा सुधा मूर्ती एक भक्कम आधार म्हणून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. कंपनीच्या चढ उतार, चांगल्या वाईट काळात नारायण मूर्तींसोबत खंबीर उभ्या राहिल्या. नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस आयटी कंपनी स्थापन करण्यात प्रचंड मेहनत घेतली त्यामध्ये सुधा मूर्तींनी देखील आपले मोलाचे योगदान दिले. आज त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअरपर्सन आहेत. या फाउंडेशन मार्फत अनेक बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेत. अनेक वंचितांना आपलंसं करून त्यांच्या आयुष्यात आनंद दिला आहे.

सुधा मूर्ती – समाजकार्य

आपण ज्या समाजात जन्मलो, वाढलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचाराने प्रेरित असलेल्या सुधा मूर्ती स्वतः आधी समाजाचा विचार करतात. इतरांच्या आयुष्यात शक्य होईल तितकं सुख आपल्याला देता यावं त्यातच खरा आनंद आहे असं मानणाऱ्या आणि तसं कृतीत उतरवणाऱ्या सुधा मूर्ती यांनी समाजकार्यातही मोलाचे योगदान दिले आहे. कर्नाटक जवळील काही भागातील देवदासी स्त्रियांसाठी त्यांनी खूप काम केले आहे. त्या स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करण्यापासून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी अतोनात कष्ट घेतले आहेत. इतकच नव्हे तर या स्त्रियांच्या मुलांच्या शिक्षणाची सोयही सुधा मूर्तींनी केली आहे.

इन्फोसिस फाउंडेशन कडून अनेक क्षेत्रात सुधा मूर्तींनी विकासाची कामे घडवून आणली आहेत व अजूनही त्या तितक्याच उत्साहाने समाजकार्यात कार्यरत आहेत. कर्नाटक मधील ग्रामीण भागात, बंगलोर शहर व इतर परिसरात त्यांनी १०,००० शौचालये बांधली आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणक व ग्रँथालये उपलब्ध करून दिली आहेत. फक्त ग्रामीण भाग नाहीतर हार्वर्ड विद्यापीठात देखील मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया नावाने ग्रंथालय सुरू केलं आहे.

तामिळनाडू, अंदमान भागात सुनामीच्या काळात त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. महाराष्ट्राशी त्यांची नाळ लहानपणा पासून जोडली आहे. महाराष्ट्रातही दुष्काळी भागातील लोकांसाठी मदत केली आहे. समाजासाठी नेहमी त्या देतच आल्या आहेत. पैसा आला तरी त्याचा त्यांनी सुयोग्य वापर केला. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, कला, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपलं योगदान दिले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन २००६ साली त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

प्रसिद्ध लेखिका, प्रकाशित पुस्तके

एक हुशार विद्यार्थिनी, पहिली महिला अभियंता, उद्योजिका, इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअर पर्सन, सामाजिक कार्यकर्ता याबरोबरच सुधा मूर्ती यांची अजून एक महत्वाची ओळख आहे ती म्हणजे – लेखिका. समजूतदार, सुहृदयी व हळव्या मनाच्या सुधा मूर्ती लेखिका म्हणूनही तितक्याच हळव्या व मनाला स्पर्शून जाणारं लेखन करतात. आजवर त्यांची अनेक विविध सामाजिक, नाती विषयांवरील पुस्तके इंग्रजी, मराठी व कन्नड मधून प्रकाशित झाली आहेत.

प्रत्येक विषय, आपले अनुभव सोप्या भाषेत मांडणाऱ्या, प्रेमळ शब्दांमधून वाचकांना आपलंसं करणाऱ्या सुधा मूर्ती उत्कृष्ट व कुशल लेखिका आहेत. महाश्वेता, तीन हजार टाके, डॉलर बहु, गरुडजन्माची कथा, वाईज अँड अदर वाईज, आयुष्याचे धडे गिरवताना, गोष्टी माणसांच्या, आजीच्या पोतडीत गोष्टी, परिधी अशा बऱ्याच पुस्तकांचं लेखन सुधा मूर्ती यांनी केलं आहे. सत्यभामा विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी त्यांना बहाल करण्यात आली आहे.

साधी राहणी उच्च विचारसरणी

यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचून देखील स्वतःतील साधेपणा जपत, मनातील सच्चेपणा जपत, आपल्यासोबत इतरांनाही प्रगतीपथावर नेत, अहंकाराला दूर सारत आणि केवळ आणि केवळ प्रेम देत सुधा मूर्ती आज जगातील तरुणांसाठी, मुलींसाठी, स्त्रियांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी रोल मॉडेल ठरल्या आहेत. आपल्या साधेपणातून व प्रामाणिक प्रयत्नातून त्यांनी ही उंची गाठली आहे.

आपल्या विचारांना, स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास लागतो सोबतच प्रामाणिकपणा आपल्यातील माणुसकी नेहमी जिवंत ठेवतो, समाजासाठी सक्रिय राहण्याची उमेद देतो हे सुधा मूर्तींना पाहिल्यावर, वाचल्यावर लक्षात येते. त्यांची धडाडी, धाडसी वृत्ती प्रत्येक स्त्रीने अंगिकारावी, आपल्या क्षेत्रात प्रगती करावी, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपले स्थान निर्माण करावे हीच सदिच्छा. सुधा मूर्ती यांचे कार्य अफाट व प्रेरणादायी आहे. या प्रेरणादायी कार्याचा, विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण म्हणजेच त्यांच्यासाठी मोठा सलाम होईल.
– सरिता सावंत भोसले

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here