भोर शहरापासून सुमारे 32 किलोमीटर इतक्या अंतरावर कांबरे बुद्रुक या गावातील धरणाच्या पात्रात श्री कांबरेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर 10 महिने पाण्याखाली असते. धरणातील पाणी जस जसे कमी होत जाते तसं मंदिर हळूहळू पाण्याबाहेर यायला सुरुवात होते. सद्यस्थितीत मंदिर पाण्याबाहेर आलेले आहे तरी आपण मंदिराला भेट देऊ शकता. (Shri Kambareshwar Temple)
मंदिराचा इतिहास
वेळवंडी नदीमधील हे प्राचीन असे पांडवकालीन शिवमंदिर आहे. या मंदिराचे मूळ नाव कर्महरेश्वर आहे. परंतु हे शिवमंदिर “ कांबरेश्वर मंदिर ” याच नावाने पंचक्रोशीत ओळखले जाते कारण ते मंदिर कांबरे या गावाच्या हद्दीत आहे. या श्री कांबरेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की ते पांडवकालीन आहे आणि हे मंदिर पांडवांनी स्वत: मिळून बांधलेले आहे, अशी इथल्या गावकर्यांची श्रद्धा आहे. (Shri Kambareshwar Mandir)
वर्षातील मे व जून असे साधारण दोन महिनेच हे शिवमंदिर भक्तांना दर्शन घेण्यासाठी पाण्याबाहेर असते. दरवर्षी मुसळधार पडणार्या पावसामुळे धरणात पाण्याबरोबर जास्त प्रमाणात गाळ वाहत येत असतो आणि या आलेल्या गाळामुळे हे मंदिर दरवर्षी जमिनीत थोडे थोडे गाडले जात आहे. दरवर्षी गावातील तरुण आणि ग्रामस्थ मंदिराची स्वच्छता करून मंदिरात साचलेला गाळ बाहेर काढतात. मंदिराचा पाया आणि त्यावरील बांधकाम अजूनही भक्कम आहे. धरणातील पाण्याच्या लाटांमुळे थोडीफार मोडतोड झाली आहे.
मंदिराबद्दल थोडसं
मंदिरामध्ये एक स्वयंभू शिवलिंग आहे. तसेच पार्वतीमातेची एक मूर्ती व एक नंदी आहे. पूर्वी मंदिरामध्ये जाताना पायर्या चढून आत जाता येत होते. मात्र दरवर्षी पाण्याबरोबर वाहत येणार्या गाळामुळे मंदिराच्या सर्व पायर्या जमिनीत गाडल्या गेल्या आहेत. मंदिरासमोर नंदी असलेला चौथरा आहे. मंदिराच्या कळसाचे तसेच वरील सर्व बाजूंचे बांधकाम हे चुनखडक, वाळू आणि भाजलेल्या विटा यांचा वापर करून केले आहे.
तर मंदिराच्या भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. मात्र हे दगड आजच्या 15-20 मजुरांना एकत्र येऊन देखील उचलता येणार नाहीत इतक्या मोठ्या आकाराचे आहेत. पांडवांनी आपल्या कुशल कलाकृतीचा त्या काळात योग्य वापर करून आयताकृती / चौरसाकृती दगड एकावर एक असे बसवून मंदिराची उत्तम अशी रचना केली आहे. अशा या पांडवकालीन प्राचीन शिवमंदिराला आपण एकदा तरी आवश्य भेट द्यावी.
मंदिरापर्यंत जाण्यासाठीचा मार्ग
आपण जर पुण्यावरून येणार असाल तर या मार्गाचा वापर करा : पुणे – शिवापुर टोल नाका – चेलाडी – नसरापुर – आंबवणे – करंजावणे – मंत्रा रिसॉर्ट रोड मार्गे – करंदी – कांबरे बु.
( पुण्यावरून येण्यासाठी इतरही दोन मार्ग आहेत. परंतु पर्यटकांनी आपापल्या माहिती नुसार त्या मार्गांनी जावे. त्यामधील पहिला मार्ग : पुणे – खेड – शिवापुर – कुसगाव (कुसगाव खिंड रोड) मार्गे – करंजावणे – मंत्रा रिसॉर्ट रोड मार्गे – करंदी – कांबरे बु. आणि दूसरा मार्ग पुणे – शिवापुर टोल नाका – चेलाडी – कापूरव्होळ – माळवाडी – भाटघर धरणाच्या बाजूने – नऱ्हे – ब्राह्मणघर – वाढाणे – करंदी – कांबरे बु)
आपण जर सातार्यावरून येऊ इच्छित असाल तर तुम्ही या मार्गाचा वापर करू शकता : सातारा – शिरवळ – शिंदेवाडी – भोर – माळवाडी – भाटघर धरणाच्या बाजूने – नऱ्हे – ब्राह्मणघर – वाढाणे – करंदी – कांबरे बु.
मंदिराला भेट देण्याची योग्य वेळ
मे व जून हे दोन महीने मंदिराला भेट देण्यासाठीची योग्य वेळ आहे. परंतु जून महिन्यात जास्त प्रमाणात पाऊस चालू झाला तर मंदिर हळूहळू पाण्याखाली जायला सुरुवात होते. त्यामुळे पावसाचा योग्य अंदाज घेऊन मंदिराला भेट देणे योग्य राहील.
– सागर जंगम (7276080456).
Nice…