प्रेरणादायी

स्वप्नांना पंखाचे बळ देऊन उंच भरारी घेणाऱ्या सखींची गाथा

International Womens Day Special Womens Success Stories | Aapli Mayboli

तू पुढे चालत राहा, स्वतःच विश्व निर्माण करू, चार भिंतीच्या पलीकडे तुझं जग निर्माण कर. तुझ्या पंखांना बळ दे आणि घे उंच भरारी. अपयशाला घाबरू नकोस. कोणाचा विचार, कोणाची काळजी करू नकोस. तू लढ आणि तू जिंक. ही अशी वाक्य दर महिला दिनाला म्हणजेच ८ मार्चला किंवा दैनंदिन आयुष्यात ही एका तरी महिलेला, आपल्या सखीला ऐकवत असतोच. ही प्रेरणादायी वाक्ये ऐकून सखीही प्रेरित होते व रोज स्वप्न बघते काहीतरी मी करणार जे माझं स्वतःच असेल. माझी ओळख निर्माण करणारं असेल. सकाळपासून घरच्यांच्या सगळ्या गरजा पुरवत, सगळ्यांच्या हाकेला ओ देत आणि सगळ्यांच्या टेन्शनचा भार डोक्यावर घेत तिचं स्वप्न ती पाहतच असते आणि जसे स्वयंपाक घरातले डबे उघडून बंद करतो अगदी तसेच परत ती स्वप्नं बंद डब्यात कोंडून ठेवते.

भारतातील जवळपास ७०% स्त्रियांची तरी हीच कथा आहे किंबहुना व्यथा आहे असं म्हणूया आपण. घडवायचं व घडायचं खूप काही असतं पण प्रत्यक्षात मात्र काही उतरत नाही…कारणं अनेक..घर, कुटुंब, मुलं, जबाबदाऱ्या, बंधन, भीती, संकोच, कमी आत्मविश्वास, जगाला सामोरे जाता येणार नाही आणि जमणारच नाही असा न्यूनगंड. नोकरी करणे शक्य असते पण स्वतःचा उद्योग वगैरे…छे!छे! ते आपलं काम नाही असं म्हणून स्वतःपासून दूर पळणाऱ्याही अनेक महिला असतात.

आपल्याला काही येणार नाही किंवा जमणार माही हा न्यूनगंड प्रत्येक स्त्रीच्या, सखीच्या मनात असतोच पण काहीजणी या न्यूनगंडावर अशी मात करून पुढे येतात की कोणताच अडथळा त्यांना रोखू शकत नाही. चूल मूल या संकल्पनेतुन बाहेर पडून या डिजिटल युगातही आपलं स्थान मजबुत करताना अनेक सखी आपल्या आजूबाजूला दिसतात. आज आपण अशाच दमदार सखींना भेटणार आहोत ज्यांनी पठडी बाहेर जाऊन, सामान्य जगातूनच वर येऊन आजच्या युगात आपली स्वतःची ओळख बनवली आहे, डिजिटल जगातही त्या कार्यरत आहेत, अनेक पुरस्कारांच्या मानकरी असून प्रत्येक स्त्री साठी, आपल्या सखींसाठी एक आदर्श आहेत.

स्वप्नांना पंखाचे बळ देऊन उंच भरारी घेणाऱ्या प्रेरणादायी सखींची गाथा :-

१) जयंती कठाळे | Jayanti Kathale

पूर्णब्रह्मच्या सर्वेसर्वा जयंती कठाळे हे नाव कोणाला माहीत नसेल तरचं नवल! पण हे नाव सहजासहजी वर आले का? नाही यामागे प्रचंड कष्ट, मेहनत व चिकाटी आहे. जयंती कठाळे या IT क्षेत्रात बंगलोर इथे नोकरी करत होत्या. नवराही याच क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर. बंगलोर मध्ये छान सुखी संसार चालला होता.

पण बाहेरच्या राज्यात व देशात महाराष्ट्रीयन अन्न मिळत नाही आणि ही खंत जयंतीना सारखी पोखरत होती. त्यांचे मिस्टर परदेशात असताना तिथे महाराष्ट्रीयन जेवण मिळाले नव्हते, तसेच त्या स्वतः लहान बाळाला ऑस्ट्रेलिया फ्लाईट मधून प्रवास करत असताना कोणतेही महाराष्ट्रीयन पदार्थ मिळाले नव्हते याच त्यांना प्रचंड दुःख होतं. आणि त्याचवेळी मनात पूर्णब्रह्म चा जन्म झाला होता.

मनात जन्माला आलेला विचार प्रत्यक्षात आणणे इतके सोप्पे नव्हते. हॉटेलिंग क्षेत्रातील शून्य अनुभव, तसेच कुटुंबातील देखील कोणी या व्यवसायात नाही तसेच महाराष्ट्रात हा व्यवसाय न उभारता बाहेरच्या राज्यात व परदेशात आपले महाराष्टातीळ पदार्थ खाऊ घालायचे, विकायचे यासोबतच आर्थिक समस्या. इतके प्रश्न समोर असताना कोणीही हा विचार मनातच दाबून आहे ती चांगल्या पगाराची नोकरी करत पुढे गेल असत. पण संकटे येतात म्हणून हार मानायची नाही असे म्हणणाऱ्या जयंती कठाळे सगळ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला उभ्या राहिल्या.

तीन वर्षे महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करून, रिसर्च करून पूर्णब्रह्मचा आलेख उभा केला. इन्फोसिस मधील आयटी विभागातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून अखेर अनेक अडचणींवर मात करत पूर्णब्रह्म हे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं. पूर्णब्रह्म यशाच्या पायऱ्या चढत होतं पण त्याचवेळी अनेक अडचणी येऊन पुन्हा शून्यातून विश्व उभं करण्याची वेळ आली तेव्हाही जयंती कठाळे हरल्या नाहीत. जिद्दीने प्रत्येक संकटाचा सामना करत नव्या जोमाने त्यांनी पूर्णब्रह्मचा आवाका वाढवला. आपलं स्वप्न, आपला व्यवसाय उभा करत असताना घराकडे, मुलांकडेही त्यांचं लक्ष होतं. व्यवसायासोबत कुटुंबालाही त्या पूर्ण वेळ देतात.

आज पूर्णब्रह्म महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर व संपूर्ण जगात पसरले आहे. Non marathi region मध्ये मराठी फूड देण्याचं धाडसी काम जयश्री कठाळे यांनी केलं आहे व त्यांच्या या कर्तृत्वामुळे बाहेरच्या देशात, राज्यात मराठी माणूस मराठी जेवणाचा आनंद घेऊ शकतो. पूर्णब्रह्म पूर्णपणे मराठी संस्कृती व परंपरेवर उभारलं आहे. ही परंपरा व ही संस्कृती स्वतः जयंती कठाळे नववारी साडी नेसून मागील तेरा चौदा वर्षे जपत आहेत.

संपूर्ण जगात मराठी अन्न व मराठी नववारी साडी याला मान मिळण्याचं मोठं श्रेय जयंती कठाळे यांना जातं. आज पूर्णब्रह्मच्या अनेक फ्रांचाईझ सुद्धा आहेत. हजारो लोकांना, स्त्रियांना पूर्णब्रह्म मुळे रोजगार प्राप्त झाला आहे. अमराठी लोकही मराठी पदार्थ उत्तम रीतीने बनवत आहेत व हे यश पूर्णब्रह्म व त्याच्या संस्थापिका जयंतींचं आहे. त्या उत्तम संस्थापिका व आपल्यासोबत अनेकांना प्रेरणा देणाऱ्या उत्तम वक्ता देखील आहेत.

रिस्क प्रत्येक गोष्टीत,प्रत्येक क्षेत्रात आहे पण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचे असेल तर रिस्क ही घ्यावीच लागते. स्वतःवर व स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास असेल तर आपली स्वप्न नक्की पूर्ण होतात व जगता येतात हे जयंती कठाळे यांच्या कडून शिकायला मिळते.

२) मधुरा बाचल | Madhura Bachal

नवशिक्या, बाहेरगावी राहणाऱ्या तरुण तरुणी किंवा महिला व पुरुष यांना उत्तम मराठी जेवण बनवायला शिकायचेअसेल तर ते युट्युब वर जाऊन मधुराज रेसिपी फॉलो करतात व स्वयंपाक शिकतात. मधुराज रेसिपी हे नाव आणि चॅनेल कदाचितच कोणाला माहीत नसावं.

मूळच्या पुण्यात राहणाऱ्या, मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मधुरा बाचल घरची परिस्थिती बेताची असल्याने बारावी पासून नोकरी करत करत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच लग्न झाल्यावर त्या पतीसोबत शिकागोला गेल्या. तिथेही स्वस्थ न बसता परदेशात, परक्या देशात त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. पण काही दिवसांनी गरोदरपणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली.

सुट्टीच्या दिवसांत मराठी पदार्थ बनवून खायची इच्छा होत असल्याने त्यांनी बऱ्याच ठिकाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ( सोशल मीडिया,युट्युब) मराठी पदार्थ शोधले परंतु त्यांना एकही मराठी पारंपरिक पदार्थ दिसला नाही आणि त्यावेळी त्यांच्यातली मराठी सुगरण जागी झाली. गरोदरपणाच्या काळात घर, स्वतःची तब्येत सांभाळून या प्लॅटफॉर्म वर त्यांनी विविध मराठी पदार्थ बनवायला शिकवले व आज देखील हे कार्य त्यांचं चालूच आहे.

पुढे भारतात परतून देखील त्यांनी हे काम जोमाने चालू ठेवल व आज त्या यशस्वी फूड ब्लॉगर म्हणून ओळखल्या जातात. आपण लावलेल्या छोट्याशा रोपट्याच एवढं मोठं झाड होईल याचा त्यांनी विचारही केला नव्हता पण काहीतरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती व त्या अस्वस्थतेतून मधुराज रेसिपीज @MadhurasRecipemarathi नावारूपाला आले. 1 मिलियनच्या वरती फॉलोअर्स असून मधुरा बाचल इथवरच थांबल्या नाहीत. मराठी जेवण शिकवतच त्यांनी स्वतःचा मसाल्याचा ब्रांड सुरू केला.

सुरुवातीला तीन मसाल्यांपासून मधुरा मसालेची झालेली सुरुवात आज अनेक मसाले मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. उत्कृष्ट चवीमुळे आज हे मसाले देखील सगळीकडे प्रसिद्ध आहेत. सामान्य घरातून आलेल्या मधुरा बाचल यांचा इथवरचा प्रवास थक्क करणारा आहे. फक्त सामान्य माणूस नाहीच तर सेलिब्रिटी पासून अनेक टीव्ही कार्यक्रमांनी मधुराज रेसिपीची दखल घेतली आहे व त्यांची ही घौडदौड चालूच आहे.

अनेकदा स्त्री म्हंटल की घर संसार काही सुटत नाही पण हे सगळं नीट सांभाळून आपली ओळख निर्माण करण्याची जिद्द असेल व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर नक्कीच मधुरा बाचल यांच्यासारखे यश मिळू शकते फक्त प्रचंड मेहनत करण्याची, समोर आलेल्या संकटाचा सामना करण्याची व संयमाची ताकद हवी. १० वर्षांपूर्वी मधुराजी यांचा फूड ब्लॉगर म्हणून सुरू झालेला प्रवास आजच्या डिजिटल युगात, इतक्या स्पर्धात्मक जगात आपले मराठी पाय रोवून घट्ट उभा आहे व तो तसाच राहो, घवघवीत यश प्राप्त होवो हीच सदिच्छा🙏.

३) अंकिता वालावलकर | Ankita Walawalkar

कोकणची चेडवा अशी ओळख असलेली ही @kokanheartedgirl म्हणजे अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर आपल्या कर्तृत्वाने सगळीकडे प्रसिद्ध आहे. Civil engineer असलेली मुलगी नोकरीसाठी कोकणातून मुंबईत आली व सध्या सगळ्या मुंबापुरीची देखील लाडकी झाली. अंकिता Teacher, instagram influencer, content creator तर आहेच पण काही वर्षांपूर्वी तिने ‘सिंधुद्योग’ नावाचा उद्योग सूरु करून उद्योजक जगतातही आपले पाऊल ठेवले.

देवबाग येथे वाढलेली, राहिलेली ही मुलगी वडिलांना त्यांच्या रिसॉर्टच्या व्यवसायातही हातभार लावते. देवबाग येथील प्रसिद्ध आंबे ती ‘सिंधुद्योग@sindhudyog उद्योगातून मुंबईतील घराघरांत पोहचवते. मुंबईत आल्यावर इथेच स्वतःच काहीतरी करून दाखवायचं हे स्वप्न उराशी बाळगून ती मुंबईला आली आणि प्रचंड आत्मशक्तीच्या जोरावर तिने स्वतःचा उद्योग, स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

एक influencer, youtuber म्हणून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कोकणाविषयी वेगवेगळे व्हिडीओ बनवत असते. अनेक समस्या, स्त्री किंवा मुलगी म्हणून तिच्या वाट्याला येणारे छोटे मोठे प्रसंग, कोकणातील विविध प्रश्न अशा अनेक विषयांवर ती आपल्या गजाली स्पेशल कार्यक्रमातुन भाष्य करते. कोणालाही न घाबरत आपले रोखठोक विचार, ठाम मतं ती मांडत असते आणि लोकांना ती पटतात देखील.आपली आवड निवड जपणाऱ्या, कुटुंब व समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या हसत पार पडणाऱ्या अंकिता कडून स्वावलंबनाचा धडा नक्कीच घ्यायला हवा.

तिच्याकडे बघून एक प्रश्न पडतो की मुलगी म्हणून हिला काही बंधनांच दडपण येत नसेल का ? पण कदाचित मुलगी म्हणून आपण स्वतःच स्वतःला जी बंधने घालून घेतलेली असतात उदाहरणार्थ मी एकटी हे कसं करू किंवा मला जमणार का ? ही बंधनेच तिने तोडून त्यातून स्वतंत्र होऊन ती पुढे आली आहे. या सगळ्या प्रवासात बऱ्याचदा तिला अपमानित केले गेले, हिणवले गेले, एकटी मुलगी काय करणार असा आविर्भाव दाखवला गेला, बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, मागे खेचण्याचे देखील प्रयत्न झाले पण अंकिता सगळ्यावर मात करत आपल पाऊल खंबीरपणे पुढे टाकत राहिली.

सोशल मीडिया अस माध्यम आहे जिथे कालचे आज कोणी लक्षात ठेवत नाही पण अंकिता तिच्या प्रामाणिक कामामुळे व सच्चेपणा मूळे लक्षात राहते. उत्तमोत्तम कंटेंटची मांडणी, कोकणवरचे प्रेम, खटकणाऱ्या गोष्टींवर बिनधास्तपणे बोलणाऱ्या अंकीताच्या कामाची दखल राज ठाकरेंपासून चला हवा येऊ द्या कार्यक्रमापर्यंत घेतली गेली.

आपल्या चुकांमधून शिकत एक युट्युबर, इंफ्लूइन्सर, कंटेंट क्रिएटर, आणि उद्योजिका म्हणून कोणताही गॉडफादर नसताना अंकिता शून्यातून आपलं साम्राज्य उभं करत आहे आणि आधुनिकतेचा हात धरत आपल्या मातीशी तिने घट्ट पाय रोवून ठेवले आहेत. एकटी म्हणून काही करता येत नाही तर एकटी असूनही स्वप्नांवर विश्वास ठेवून सारे काही मिळवता येते, स्वप्न पूर्ण करता येते, आपल्या पायावर उभे राहता येते याचा आदर्श नक्कीच अंकिता @kokanheartedgirl कडून घेण्यासारखा आहे.

४) सुमन धामणे | Suman Dhamane Aapli aaji

“कसे काय बाळांनो..मजेत आहेत का” अशी प्रेमळ हाक मारून प्रेमाने पारंपरिक तसेच आधुनिक पदार्थ शिकवणाऱ्या आजी म्हणजेच ‘ सुमन गोरक्षनाथ धामणे ‘ यांनी अल्पावधीतच अख्या महाराष्ट्राचं व संपूर्ण जगाचंच मन जिंकुन घेतलं. मूळच्या अहमदनगर मधील छोटयाशा गावात राहणाऱ्या आजींचा प्रत्येक व्हिडीओ बघताना अस वाटत की आपलीच आजी प्रेमाने, काळजीने हात धरून काहीतरी शिकवते, पोटतिडकीने काहीतरी सांगते, प्रेमाने खाऊ घालते.

नववारी साडी आणि साधी सरळ प्रेमळ भाषा यांनी आजी आपल्या घरातीलच आजी वाटू लागतात. आजींना पहिल्या पासून स्वयंपाकाची आवड, नवनवीन पदार्थ बनवून खाऊ घालायची आवड. वयाच्या साठी नंतर त्यांची हीच आवड लक्षात घेऊन त्यांच्या नातवाने ‘आपली आजी’ नावाचा युट्युब चॅनेल काढला व आजींकडून रेसिपीचा क्लास सुरू झाला. कधीही कॅमेरा समोर उभ्या न राहिलेल्या आजी आपलं आवडत काम करताना मात्र बिनधास्तपणे कॅमेरा समोर वावरतात, बोलतात. या वयातही सगळ्या बुरसटलेल्या विचारांना छेद देत त्यांनी डिजिटल युगाला व डिजिटल युगाने त्यांना आनंदाने स्वीकारलं.

आपले पारंपरिक पदार्थ जगाला शिकवताना त्यातून त्यांना आनंद मिळत गेला, समाधान मिळत गेलं. आधुनिक तरुणांना भुरळ घालणारे पदार्थ येत नसले तरी आजी त्या स्वतः शिकल्या व चॅनेल वर शिकवल्या. इतक्या दांडग्या उत्साहाचं कौतुकच आहे. पैसे मिळणे ही गरज नव्हतीच पण जे आपल्याला येतं, ज्यात आपल्याला समाधान मिळत असे करण्याची निकड होती आणि नातवामुळे ‘@आपलीआजी’ माध्यमातून त्यांना या वयात ते सुख मिळालं, खूप प्रेम मिळालं. आज आजींचे १५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत तसेच आजींनी स्वतःचा मसाल्याचा व्यवसाय देखील सुरू केला आहे. अलीकडेच लोकमत सखी कडून त्यांना बेस्ट युट्युबर म्हणून सन्मानित करण्यात आलं. नुकतंच ‘आपली आजी’ बिझनेस ग्रुपला महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

खरंच व्यवसाय करायला, नवं काही सुरू करायला, शिकायला आणि शिकवायला कोणत्याच वयाची अट नसते हे आजींकडे पाहिल्यावर स्पष्ट होतं. हा चॅनेल चालवताना अनेक अडचणी आल्या, चॅनेल वाढत असतानाच हॅकही झाले परंतु आजींनी आणि नातवाने हार नाही मानली. अनेक प्रयत्न करून चॅनेल तर परत मिळवलंच पण नव्या जोमाने पुन्हा कॅमेरा समोर उभ्या देखील राहिल्या. या वयातील त्यांची जिद्द आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. आजींची अशी भरभरून प्रगती होत राहो व त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हसू कायम टिकून राहो. आजींच्या कार्याला सलाम व शुभेच्छा💐

तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करताना भीती वाटत असेल, नाउमेद वाटत असेल, जगाचा विचार करत असाल तर वरील सगळी उदाहरणे जवळून पाहा, वाचा. कोणताही भक्कम पाठिंबा नसताना अत्यंत खडतर परिस्थितीतुन या महिलांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं, साम्राज्य उभं केलं. स्त्री म्हणून स्वतःला कमी लेखन आधी बंद करून मी ही काहीतरी करू शकते असं आत्मविश्वासाने म्हणा आणि आपला बंद स्वप्नांचा डबा उघडा व ती स्वप्ने सत्यात आणा.

सर्वात महत्वाचे दुसऱ्या स्त्री बद्दल राग, द्वेष, असूया, कृतघ्नता मनात बाळगून नुकसान स्वतःचच करून घेत आहात हे लक्षात घ्या. एखादी स्त्री प्रगती करून आपलं अस्तित्व निर्माण करू लागली की तिच्याबद्दल वाईट बोलणे, नकारात्मकता पसरवणे अशी कृत्ये बंद करून तिच्या कडून प्रेरित होऊन, चांगल्या गोष्टी आत्मसात करून प्रसंगी तिच्या कर्तृत्वाचं कौतुक करून आपलीही ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करावी.

आपल्या स्वप्नांच्या पंखात बळ देऊन उंच भरारी घेण्याचं धाडस ठेवावं. आता स्त्री पुरुष समानता,अबला सबला स्त्री वगैरे संकल्पनेतून बाहेर पडून ” गरज आहे स्त्री कडून स्त्रीला आत्मसन्मानाची ‘ती’ कडून ‘ती’ ला खंबीर साथ देण्याची “.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎉

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here