प्रेरणादायी

नाती स्वप्नांना पंख देणारी

Importance of Relationship | Aapli Mayboli

तेव्हा मी दुसरीत किंवा तिसरीत असेन. बाहेर जोराचा पाऊस येत होता. सगळीकडे अंधारून आलं होतं. अंगाभोवती उबदार पांघरूण लपेटून टीव्हीवर लागलेल्या कार्टूनमध्ये नाक खुपसून मी बसले होते. मधेच चमकणाऱ्या विजांमुळे दचकायला होत होतं.

तेवढ्यात घराच्या वरांड्यातून आईचा आवाज ऐकू आला. ती मला हाका मारत होती. त्याक्षणी पांघरुणातल्या उबेतून बाहेर येण्याची माझी खरंतर इच्छाच नव्हती. पण ‘अगं गारा पडतायेत’ असं काहीतरी आई म्हणाली आणि मी पांघरुणासकट बाहेर धावले. बघते तर काय, माझी आई पावसात उभी होती. छत्री उलटी करून मजेत गारा वेचत होती आणि मला बोलावत होती. मला इतका विलक्षण आनंद झाला की मी धावतच आईला जाऊन बिलगले. गारा वेचल्या. त्या पावसात आम्ही दोघी यथेच्छ हुंदडलो.

आई – आयुष्यातला पहिला गुरू

प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला गुरू कोणी असेल तर ती ‘आई. त्यावेळी माझी आई मला पावसात भिजू देते, या पलीकडे मला त्या प्रसंगाचं अप्रूप नव्हतं. पण आज कळतंय तो एक संस्कार होता. निसर्गाशी जवळीक कशी साधायची याचा एक अत्यंत सहजसुंदर धडा होता, जो आईनं गुरूच्या भूमिकेत शिरून चटकन शिकवून टाकला होता. हे आणि असे कितीतरी प्रसंग. थोडंसं आठवून बघा. तुमच्याही नजरेसमोर तरळतील असे कितीतरी प्रसंग, ज्या प्रसंगांनी आणि त्या प्रसंगातल्या माणसांनी तुम्हाला कळत नकळतपणे बरंच काही समजावून सांगितलेलं असतं.

नात्यांचं समीकरण

आपण हल्ली नात्यांबद्दल प्रचंड बोलतो. त्यातल्या बऱ्यावाईट, आधुनिक संदर्भांचा तर येता-जाता फडशा पाडत असतो. पण ही नातीच अनेकदा आपल्या आयुष्यात गुरूची महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपल्याला खूप काही शिकवून जातात. फक्त नात्यांची ही बाजू बघायचं आपल्याकडून राहूनच जातं. त्यासाठी लागणारा वेळ आणि डोळस मोकळेपणा आपल्याकडे असतोच असं नाही. नाती- मग ती रक्ताची असो नाहीतर आपण स्वत: निवडलेली, आपोआप आपल्याही नकळत तयार झालेली. या प्रत्येक नात्याला असतो एक वेगळा चेहरा. प्रत्येक नात्याच्या असतात काही विशिष्ट गरजा. बे दुणे चार कधीच असत नाहीत नात्यात, तरीही प्रत्येक नात्याचं असतं एक समीकरण, असतात काही ठोकताळे. ते समजून घ्यायचे ज्याक्षणी आपण विसरतो त्याक्षणी आपण आपल्यासाठीचा प्रशिक्षणाचा, अनुभवाचा एक मोठा कप्पा बंद करून टाकतो.

नातं कधी मैत्रीचं, कधी रक्ताचं तर कधी फक्त परिचयाचं. ही नाती आपल्याला बरंच काही शिकवून जातात. यातूनच कधी नवा दृष्टिकोन मिळतो, कधी जगण्याची नवी उमेद, तर कधी भटकलेल्याला योग्य मार्ग.

सारं काही नातीचं तर शिकवतात

माणसांवर फुल्या मारायची आपल्याला भलतीच घाई झालेली असते. अशावेळी मग ती व्यक्ती आपल्याला काय सांगते आहे हे ऐकण्याइतकी उसंतही आपल्याजवळ असत नाही. मग ती मैत्री असू देत, नाही तर प्रेम. कुठलीही नाती तोडायला काहीच वेळ लागत नाही. पण त्या नात्यांमधला प्रत्येक सूर अचूक लागावा यासाठी मात्र दिवसरात्र मेहनत करावी लागते. स्वार्थ, माझं, माझ्यापुरतं, इगो अशा कितीतरी गोष्टींना कोपरा दाखवावा लागतो. आणि हे सगळं करणं इतकं सोपं कधीच नसतं. एकमेकांच्या आयुष्याला सतत काहीतरी भरभरून देण्याची इच्छा असली तर त्या नात्यांची पालवी कधीच झडत नाही. बहर कधीच ओसरत नाही. नाती सारं काही शिकवतात ती अशीच. काही कळत आणि बरचसं नकळत.

इथे प्रत्येकजण आपला गुरु आहे

इंटरव्ह्यूला जाताना चार अनुभवाचे बोल सांगणारी मोठी भावंडं, बेस्ट ऑफ लकचा एसेमेस करून तुम्ही येईपर्यंत कट्ट्यावर वाट बघत उभा राहणारा मित्र, कामात काहीतरी गडबड झाली म्हणून फायरिंग करणारा बॉस, आपल्या कामात प्रत्यक्ष ढवळाढवळ न करता, तरीही आपल्या कामावर नजर ठेवून असलेला आपला कलिग, आपल्यावर जिवापाड प्रेम करणारं कुणी, आपल्या खोलीतल्या भिंतीवरचा चिवट कोळी, खिडक्याच्या कोनाड्यातून धावणारी आणि सतत कसल्यातरी गडबडीत असणारी मुंगी, ट्रॅफिकमध्येही हॉर्न न वाजवता शांतपणे समोरच्याच्या हलण्याची वाट बघणारा कुणी ड्रायव्हर, आपल्याला छान-छान गोष्टी सांगणारे आजोबा, आपल्या बाहुलीच्या लग्नासाठी इटुकले पिटुकले लाडू वळून देणारी आपली आजी आणि आपल्या सदैव पाठीशी असणारे आणि आपण पाठीशी आहोत हे भासू न देणारे बाबा….यातला प्रत्येक जण आहेच की आपला गुरू.

नातं गुरुचं

दरवेळी गुरू कोणीतरी एकच असायला पाहिजे असं असत नाही. सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत असा कुणी एक गुरू असतही नाही. आणि तसंही रोजच्या जगण्याच्या रामरगाड्यात अशा कुणातरी एक, ज्याच्यापर्यंत पोचणं महाकठीण, त्यानं आपल्याला स्वीकारणं त्याहूनही कठीण. म्हणूनच गुरू एकच असायला हवा असं मानण्याचं काहीच कारण नाही. आपल्या आजूबाजूला, आपल्या संपर्कातला प्रत्येक माणूस जो आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट शिकवतो, एखादा नवा दृष्टिकोन देतो, जगण्याची नवी उमेद देतो, नवं बळ देतो, आपलं नेमकं काय चुकतेय हे समजावून सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या छोट्या-छोट्या स्वप्नांना पंख देऊन उडायला शिकवतो, आनंद देतो तो प्रत्येक जण आपला गुरू असतो.

आजूबाजूला जरा नीट बघा. कलुषित झालेली मन नीतळ करून बघा. पूर्वग्रह सोडून बघा. गुरू कोण नाही ? तर सगळेच आहेत. आपल्याशी रक्तानं जोडलेला किंवा न जोडलेला; पण आपल्या आयुष्यात कुठलं ना कुठलं तरी नातं घेऊन येणारा प्रत्येक जण असतो आपला गुरू.

कुणाकडून काय शिकायचं? कसं शिकायचं? आणि कधी शिकायचं? हे फक्त समजायला हवं ।
– मुक्ता चैतन्य
muktachaitanya11@gmail.com

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here