आरोग्य

सकाळच्या न्याहारीचे महत्त्व

Importance of Morning Breakfast

आपल्या रोजच्या दिनचर्येत न्याहारीला खूप महत्त्व  आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सकाळी काही न खाता घराबाहेर निघतो. सकाळी भूक लागत नाही. खायला वेळ नसतो, असे म्हणून न्याहारी टाळली जाते. सकाळी चहा, कॉफीवर दुपारच्या जेवणापर्यंतची वेळ आपण मारून नेत असतो.

आपण रात्री नऊ दहाच्या सुमारास जेवण करतो. त्यानंतर झोपतो. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर जर सकाळी न्याहारी केली नाही, तर दुपारी जेवणापर्यंत बारा ते तेरा तासांचे अंतर असते. या वेळात मेंदूकडून खाण्याची गरज भासते. पण शरीराकडून ती भागवली जात नाही. त्यामुळे पेशींना शरीरात असलेली चरबी साठवून ठेवण्याची सूचना मिळू लागते. त्यामुळे शरीरात कॅलरीज साठवून ठेवली जाते आणि त्या कॅलरीजचे मेदात रूपांतर होत असते. त्यामुळे आपले वजन वाढतच जाते.

आपल्याला जर सकाळी भूक लागली तर आपण चहा, कॉफी, चिप्स, वडे असे पदार्थ खाऊन वेळ मारून नेतो आणि त्यामुळे पचनसंस्था बिघडून जाते. नाष्टा पौष्टिक असावा. आपण अनेकदा फक्त दूध किंवा ब्रेड, टोस्ट असे पदार्थ खातो. पण शरीराच्या दृष्टीने ते घातक आहेत. न्याहारीत विविधता असावी. न्याहारी पोटभर खावी, पण पचायला हलकी असावी आणि ती पौष्टिक असावी. भारतीय हवामानानुसार पचायला जड पदार्थ टाळावेत. वयानुसार न्याहारीत बदल असावा. मोठ्या माणसाच्या न्याहारीत कार्बोहायड्रेडचे प्रमाण असावे. लहान मुलांना कॅल्शियम आणि प्रथिनयुक्त न्याहारी असावी. वृद्धांची न्याहारी पचायला हलकी असावी.

आपण न्याहारीत अंडी, मांसाहार, बटर, चीज घेतो. पण हे पदार्थ थंड हवामानातील प्रदेशात पचायला सोपे असतात. भारतीय हवामानानुसार हे पदार्थ येथे पचायला जड असतात. त्यामुळे सकाळच्या न्याहारीत पोहे, उपमा, शेवया, पराठे, इडली, डोशासारखे पदार्थ घ्यावेत. त्याचबरोबर फळे, ज्यूस, दूध यांचाही न्याहारीत समावेश असावा.

नाश्ता परिपूर्ण असल्यास दिवसभर उत्साह असतो. शरीराचे पचनतंत्र सुधारते. लहान मुलांना नाष्ट्याची सवय लहानपणापासूनच लावावी. त्यामुळे त्यांना अभ्यासाला, खेळायला उत्साह येतो. दूध आणि फळांमुळे पोषकतत्वे मिळतात. आपण बऱ्याचदा नाष्ट्यानंतर चहा किंवा कॉफी पितो, पण त्याऐवजी दूध प्यावे. दुधामुळे पूर्णाहार मिळतो.

नाष्ट्यासाठी घरी बनवलेले पदार्थ वापरा

नाष्ट्यासाठी बाहेरील विकतच्या पदार्थांचा वापर टाळावा. त्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांचा समावेश करावा. बदामाचा शिरा, फळे यांचा न्याहारीत समावेश असावा. पूर्वी न्याहारीत लोक थालीपीठ, डाळीच्या पदार्थांचा उपयोग करत असत. पण जसजसा काळ बदलत गेला, तसतसे न्याहारीचे स्वरूपही बदलत गेले. सध्याच्या काळात मात्र न्याहारी ही आपणाला काहीच घरात दिसते. सकाळच्या न्याहारीचे खूप महत्त्व आहे. न्याहारीने स्फूर्ती येते. शक्तीमध्ये वाढ होते. सकाळचा नाष्टा आपल्याला दिवसभर चैतन्य देतो. नाष्टा भरपेट आणि पौष्टिक असेल तर दिवसभरसुद्धा आपण न जेवता अथवा कमी जेवून चांगले काम करू शकतो. नाष्टा हा नुसता पोटाची खळगी भरण्यापुरता करू नये. नाष्ट्यापासून आपल्याला आवश्यक असे जीवनसत्त्व व शरीराला लागणारी ऊर्जासुद्धा मिळाली पाहिजे.

वयोमानानुसार नाष्टा द्यावा

लहान मुले, मोठी माणसे व वयस्करांना त्यांच्या शरीराच्या गरजेनुसार नाष्टा द्यावा. नाष्ट्यामध्ये थालीपीठ, इडली, पोहे, डोसा, जिराभात, साबुदाण्याची खिचडी, मुगाची खिचडी, शेवया, पुलाव, उतप्पा, अंडे, उपमा, शिरा, खजूर, मनुके, बदामयुक्त खीर, घावण, टोमॅटो आम्लेट, दुधपोळी, धिरडे, मोड आलेल्या कडधान्याची उसळ, फळे इ. पदार्थ असावेत.

नाष्ट्यामध्ये खालील पदार्थ टाळावेत

नाष्ट्यामद्ये बर्गर, पिझ्झा इत्यादी फास्टफूड व कार्बोनेटेड पेय टाळावे. चॉकलेट, जाम, केक, चिप्स व पॅकबंद पदार्थसुद्धा टाळावेत. हॉटेलमधील तळलेले पदार्थ उदा. वडा, भजी, गुलाबजाम इ. कृत्रिम रंग, चव व प्रिझरव्हेटीव्ह टाकलेले पदार्थ आवर्जून टाळावेत. मैदा, मीठ व तेलापासून केलेले बाहेरील पदार्थ टाळावेत. कार्बोनेटेड पेयसुद्धा शरीरास हानिकारक आहेत. नाष्ट्यामध्ये बाहेरील तेलकट, गोड पदार्थ टाळावेत. त्यातील अतिरिक्त साखर शरीरात गेल्यानंतर चरबीच्या स्वरूपात रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. स्थूलपणा येऊन वजनही वाढते. वाढलेले वजन आपणाला निष्क्रिय बनवते.

सकस व पोषक नाष्टा असावा

नाष्ट्याला आहारात जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व तो नाष्टा कसा आहे, किती अचूक आहे, यालादेखील आहे. म्हणून नाष्टा पोषक, सकस असावा.

निशिगंधा चोळके

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here