महाराष्ट्राचे नववर्ष ३१ डिसेंबरला न होता चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी अर्थातच गुढीपाडवा या दिवशी होते. गुढीपाडवा हा सण मराठी नववर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात धामधुमीत सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो.
गुढीपाडवा शालिवाहन संवत्सर राचा पहिला दिवस मानला जातो. वेदांग ग्रंथात सांगितल्याप्रमाणे महत्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे. यादिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, कपडे खरेदी करणे, सोने खरेदी करणे, नवीन उपक्रमांची सुरुवात करणे सगळे शुभ मानले जाते. त्यामुळे गुढीपाडवा या सणाला महाराष्ट्रात खूप महत्व आहे. (importance of gudi padwa festival in marathi)
या दिवशी दारोदारी गुढी उभारली जाते. कडुनिंब,गूळ,खोबरे, साखर प्रसाद म्हणून वाटले जाते. चौकटीबाहेर शेणाचे छोटे पाडवे काढले जातात. घराबाहेर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. चौकटीवर आंब्याची पाने व झेंडूची फुले यांचे तोरण बनवून लावले जाते. घर सजवून, नवीन कपडे परिधान करून, गोड जेवण बनवून, नवीन वस्तुंची खरेदी करून, घरातील वाहनांची पूजा करून, देवाचे आशीर्वाद घेऊन मराठी माणूस मराठी नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने उत्साहात करतो. (why we celebrate gudi padwa festival)
गुढीपाडव्याला गुढी उभारण्यामागील पौराणिक कथा
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. असे म्हंटले जाते की श्री राम वनवास संपवून परत अयोध्येला याच दिवशी आले म्हणून या दिवशी घरोघरी यशाची गुढी उभारली गेली व तेव्हापासून हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा होतो.
दुसरी कथा म्हणजे भगवान शंकर व पार्वती यांचे लग्न पाडव्याला ठरले व तृतीयेला झाले म्हणून या दिवशी आदिशक्तीची पूजा केली जाते.
तिसऱ्या कथे नुसार महाभारतात आदीपर्वात उपरिचर नावाच्या राजाला इंद्राने कळकाची काठी दिली होती व त्या राजाने याच दिवशी ती जमिनीत रोवली व नविन वर्षात तिची पूजा केली तेव्हापासून गुढीपाडव्याला नवीन वर्ष मानले जाते व आनंदाची गुढी उभारली जाते.
इतिहासात ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केल्याचा उल्लेख आहे. अशा कित्येक कथा गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे असल्यातरी आपले नवीन वर्ष मराठी पद्धतीने, मराठी संस्कृती जपत साजरा करण्यात वेगळाच आनंद आहे. यातील प्रत्येक प्रथेमागे वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे हे स्पष्ट होते.
गुढी कशी उभारतात ?
गुढीपाडवा सणा दिवशी सकाळी लवकर उठून शुद्ध होऊन दारात गुढी उभारण्याची व तिची पूजा करण्याची प्रथा आहे. यासाठी एक उंच बांबू किंवा कळक स्वच्छ धुतला जातो. त्याला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळून त्यावर चांदी/ तांब्याचा तांब्या ठेवुन त्याला आंब्याची डहाळी, कडुनिंब पाने, फुलांची माळ किंवा हार, साखरेची माळ म्हणजे गाठी घालून हळदी कुंकू वाहून पूजा केली जाते व ती उंच घरावर किंवा खिडकीत उभी केली जाते.
शहरात जागेच्या मर्यादेमुळे खिडकीत गुढी उभारतात. गुढी ही आनंदाचे, मांगल्याचे, सौख्याचे, समाधानाचे,चैतन्याचे प्रतीक मानले जाते. गुढीसमोर उभा राहून येणारे नवीन वर्ष सुख समाधानाचे व निरोगी जावे अशी प्रार्थना केली जाते. गुढी भोवती छान रांगोळी काढली जाते. गुढीसमोर नारळ फोडून गूळ खोबरेचा नैवेद्य दाखवला जातो.
गुढीची पूजा झाल्यानंतर खोबरे, गूळ व कडुनिंब पाने यांचा प्रसाद सगळ्यांना दिला जातो. यशाचं, आनंदाचं प्रतीक म्हणून सकाळी उभारलेली गुढी संध्याकाली सूर्यास्तानंतर उतरली जाते. (significance of gudi padwa)
गुढीपाडवा महत्व, परंपरा, शोभायात्रा, खाद्यसंस्कृती
गुढीपाडवा सणामागे अनेक पौराणिक कथा असल्या तरी बदलत्या मराठी महिन्यानुसार आणि ऋतूनुसार गुढीपाडव्याचे विशेष महत्व आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची तयारी करत गुढीपाडवा येतो. वसंत ऋतूत पिवळी पाने गळून हिरवी पालवी फुटायला सुरुवात होते. निसर्ग बहरायला सुरुवात होते. याचीच चाहूल घेऊन गुढीपाडवा सण येतो. नवीन बहराचे प्रतीक म्हणून आंब्याची डहाळी गुढीला घातली जाते.
असे मानले जाते की, गुढीपाडव्याला ब्रह्मांडातीळ प्रजापती लहरी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाठवल्या जातात आणि त्या लहरी स्वतःकडे खेचून घेण्याचे काम गुढी करते. तांब्याचा तांब्या म्हणजे तांब्याचा धातू या लहरी स्वतःकडे आकर्षित करते. या तांब्याचे मुख खाली असल्याने या लहरी घरात प्रवेश करतात व शुभ सकारात्मक प्रवाह घरात होतो अशी मान्यता आहे. पुढे याच तांब्याच्या पाणी पिल्याने आरोग्य निरोगी राहते असे म्हंटले जाते म्हणून तांब्याच्या भांड्यातून पाणी पिले जाते.
याच काळात उन्हाळा सुरू असतो. उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते त्याचे परिणाम शरीरावर होत असतात. शरीरावर थंडावा मिळावा तसेच पित्तनाश व्हावे यासाठी कडुनिंबाचा रामबाण उपाय म्हणून वापर केला जातो. याचसाठी गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या पानासोबत ओवा, मिरी, हिंग, मीठ, खोबरे, साखर वाटण्याची प्रथा आहे. यामुळे शरीर निरोगी राहते.
तसेच धान्यातील कीड नाहीशी होण्यासाठी देखील कडुनिंबाच्या पानाचा वापर केला जातो. निरोगी शरीरासाठी कडुनिंब किती उपयोगी आहे याची आठवण राहण्यासाठीच गुढीपाडव्याला कडुनिंब वाटले जाते. सणाच्या आनंदासोबत आपल्या शरीरासाठी आयुर्वेद किती महत्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न सणाच्या प्रत्येक प्रथेतून केला जातो.
आनंद व समृद्धी यांचे प्रतीक म्हणजे गुढीपाडवा
आनंदाचे व समृद्धीचे प्रतीक असलेल्या या गुढीपाडवा सणाचे स्वागत पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या जल्लोषात केले जाते. नववारी साडी, नाकात नथ, केसात गजरा, ठुशी, पारंपरिक दागिने असा मराठमोळा साज शृंगार करून स्त्रिया, मुली या दिवशी नटतात तर मुले, पुरुष मंडळी पारंपारिक कुर्ता, धोती, सलवार, कोल्हापुरी चप्पल, फेटा असा वेष करतात.
शहरातील अनेक भागात या दिवशी असा पारंपारिक पेहराव करून लेझीम, ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढली जाते. ठिकठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. झेंडूची फुले व आंब्याची पानांनी सजावट केली जाते. मराठी नवीन वर्षाचे स्वागत अशा प्रकारे इतक्या जल्लोषात गुढीपाडव्याला केले जाते.
मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा अत्यंत प्रिय व खास सण असल्या कारणाने प्रत्येक भागात त्या त्या भागातील प्रथेनुसार किंवा वैशिष्ट्य नुसार पारंपारिक, साग्रसंगीत असे जेवण केले जाते थोडक्यात पंचपक्वाने केली जातात.
पुरणपोळीचे जेवण, श्रीखंड पुरी, मसालेभात, गुलाबजाम, बासुंदी पुरी, भाजी पुरी, कोशिंबीर, चटण्या, भजी, अळूवडी, लोणचे, पापड, तळण, बटाटा भाजी असे विविध पदार्थ आनंदाने बनवले जातात. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील खाद्यपदार्थ संस्कृती नुसार मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते.
मराठी नववर्ष
अशा प्रकारे हिंदू सणातील सर्वात महत्वाचा सण – मराठी नववर्ष गुढीपाडवा सणाचे अनन्यसाधारण महत्व महाराष्ट्रात आहे. जुन्या पिढी सोबत नवी पिढी, नवी तरुणाई देखील ही मराठी संस्कृती तितक्याच आत्मीयतेने जपत गुढीपाडवा सणाचे स्वागत करते.
Happy new year म्हणण्यापेक्षा “मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा” ,”गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा” असे म्हणण्यात एक आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, माया आहे, हसू आहे, आनंद आहे, समाधान आहे जे इतरत्र कुठेही नाही. ही परंपरा, हा वारसा असाच पुढे चालत राहावा, प्रत्येक पिढी नववर्ष तितक्याच उल्हासात साजरी करावी यासाठी आपणही हा वारसा पुढे नेला पाहिजे – प्रेमाने आणि आपुलकीने.
तुम्हालाही गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा😊🙏.
Comment here