आरोग्य

हिवाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी ?

How to Take Care of Yourself during Winter | Aapli Mayboli

हिवाळा म्हंटल की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बोचणारी सुखद थंडी, वाफाळलेला चहा, कॉफी, मऊ शाल, ऊबदार स्वेटर, मफलर, कानटोपी आणि उशीरापर्यंतची झोप. तस यामुळेच की काय हिवाळा हा सुखद ऋतू वाटतो बऱ्याचदा. प्रसन्न वातावरणामुळे काम करण्याची ऊर्जाही या दिवसांत अधिक असते. विविध फळे, भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात सोबतीला सणवारही असतातच. एकंदरीत बहुतेकांचा हिवाळा हा आवडत ऋतू असतोच.

हिवाळ्यात हवामान थंड असते व हवेत कोरडेपणा जास्त असतो. या कोरड्या वातावरणामुळेच त्याचे शरीरावर, त्वचेवर, केसांवर परिणाम दिसू लागतात म्हणून हिवाळ्यात स्वतःची काळजी घेणे फार आवश्यक असते. वातावरणात गारवा वाढत असल्यामुळे आरोग्याबाबत विविध तक्रारी उभ्या राहतात. सर्दी, पडसे, खोकला, ताप, जुलाब तसेच त्वचा, केसांसंबंधी देखील अनेक समस्या सुरू होतात.

अशा वेळी हिवाळ्यात असे त्रास वारंवार उदभवू नयेत म्हणून ही काळजी नक्की कशी व कोणत्या प्रकारे घ्यायची हेच आजच्या लेखात पाहणार आहोत.

हिवाळ्यातील आहार

प्रत्येक ऋतुप्रमाणे भारतात आहार पद्धती वेगळी आहे. ऋतू बदलतो तसे वातावरणातील तापमान देखील बदलते व याचा आपल्या जीवनशैली वर परिणाम होत असतो. ऋतुप्रमाणे वेगवेगळे अन्नपदार्थ, भाज्या, फळे उपलब्ध असतात. हे अन्नपदार्थ त्या त्या ऋतूत योग्य पद्धतीने घेतले तर अनेक आजारांपासून लांब राहत येते. हिवाळ्यात थंडीमुळे अनेक आजारांचा धोका असतो त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात कोणता आहार करावा

१. हिवाळ्यात विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या उपलब्ध होतात. या दिवसांत भाज्या व फळे यांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे असतात तसेच फळांमध्ये देखील खनिजे, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स यांचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते व आजारांशी लढण्याची ताकद वाढते.

२. अतिथंड पदार्थांचे सेवन या दिवसात टाळावे.

३. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णतेची गरज असते त्यामुळे खजूर, शेंगदाणे, तिळाचे लाडू, गूळ, खारीक, बेदाणे, अक्रोड असे शरीरात उष्णता टिकवून ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन अधिक करावे.

४. हिवाळ्यात हृदयरोगाचे प्रमाण वाढते. शरीरातील साखर व कोलेस्टेरॉल यांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. हे नियंत्रित राहण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे तसेच हिवाळ्यात मिठाचे सेवन कमी करावे त्यामुळे हृदयरोगाचे आजार उदभवणार नाहीत.

५. हिवाळयात शरीरात कोरडेपणा वाढतो.. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध दुग्धजन्य पदार्थ व स्निग्धयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
दूध, तूप, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू अशा शक्तिवर्धक पदार्थांचा आहारात समावेश करावा.

६. मांसाहार म्हणजे अंडे, चिकन खाणे फायदेशीर ठरते.

हिवाळ्यात व्यायाम करावा की नाही

व्यायाम केव्हाही शरीर सुदृढ ठेवण्यासाठी उत्तम असतो. थंडीत मात्र सकाळी उठून व्यायामाला बाहेर पडणे नकोसे वाटते पण स्वतःला फिट ठेवायचे असेल तर हिवाळ्यात देखील साधे सोपे व्यायाम प्रकार करणे गरजेचे आहे. हिवाळ्यात शरीरातील स्नायू आखडतात, दुखतात. हे दुखणे टाळण्यासाठी शरीराची हालचाल होणे खूप गरजेचे आहे म्हणून रोज जमेल तसे वॉकिंग, जॉगिंग करणे फार गरजेचे आहे.

रोज चालण्याचा व्यायाम केल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते व रक्ताभिसरण देखील सुरळीत होते. सूर्यनमस्कार, योगासने थंडीच्या दिवसांत आवर्जून करावीत. शरीर उबदार राहण्यासाठी व लवचिक राहण्यासाठी हिवाळ्यात योगासने करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

थंडीत सूर्यनमस्कार, पर्वतासन, वीरभद्रासन, मत्स्यासन, हलासन, सर्वांगासन अशा प्रकारची आसने जरूर करावीत ज्यामुळे शरीर, मन प्रसन्न राहते. कोणत्याही आजाराचा धोका राहत नाही. हिवाळ्यात सुरू केलेला व्यायाम नियमितपणे पुढेही चालू ठेवल्यास शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

हिवाळ्यात पाणी व इतर पेय यांचे सेवन

आपल्या शरीरातील ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. तज्ज्ञाच्या मते दिवसाला शरीरात पाच ते सहा लिटर पाणी जाणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणी भरपूर पिलं जात पण हिवाळ्यात थंड वातावरणामुळे तहान कमी लागते व पाणी देखील कमी पिले जाते. त्यामुळे हिवाळ्यात बऱ्याचदा डिहायड्रेशनचा त्रास उदभवतो.

शरीर दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. यासाठी सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यावे यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. व्यायाम करताना व व्यायाम करून झाल्यावर पुरेसे पाणी प्यावे.

सकाळचा नाश्ता झाल्यानंतर काही वेळानंतर एक ते दोन ग्लास प्यावे. हिवाळ्यात जास्त पाणी प्यावेसे वाटत नसले तरी जमेल ताई थोड्या थोड्या वेळाने पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दुपारी जेवण झाले की काही वेळाने पाणी प्यावे. सतत पाणी पिण्याचा कंटाळा येऊ शकतो अशा वेळेस नारळ पाणी, लिंबू पाणी, फळांचा रस घ्यावा जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही.

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी पिल्यास शरीराला फायदा होतो. हिवाळ्यात रात्री कोमट पाण्यात चिमूटभर हळद घालून पिल्यास सर्दी, खोकला असे त्रास उदभवत नाहीत. आजारांवर नियंत्रण राहील. शरीराला जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढे घेणे गरजेचे आहे त्यामुळे मुबलक पाणी प्यावे. शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी चहा, कॉफी (प्रमाणात),सूप यांचे सेवन करावे.

हिवाळ्यात थंडीपासून सरंक्षण कसे करावे ?

हिवाळा म्हंटल की कडाक्याची थंडी असणारच. अशा थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ऊबदार कपडे घालावेत. स्वेटर, पायमोजे, हातमोजे, कानटोपी अशा ऊबदार गोष्टींचा वापर करावा. कोवळ्या सूर्यप्रकाशात बसावे. गरम पाण्याने आंघोळ करावी.

थंड पाणी पिल्याने त्रास होत असल्यास हिवाळ्यात कोमट पाण्याचेच सेवन करावे. थंड पदार्थ टाळावेत. बाहेर जायचे असल्यास हात, पाय, संपूर्ण शरीर झाकले जाईल असे जाड कपडे परिधान करावेत. घरात थंड हवा येणार नाही यासाठी दारे, खिडक्या बंद ठेवा. हिटर असल्यास त्याचा वापर करावा.

मुलांनाही ऊबदार कपडे घालावेत. शरीरातील उष्मा टिकून राहील असे पदार्थ मुलांनाही खायला द्यावेत. घरातील फरशी, जमीन थंड असेल तर बसायला चटई किंवा जाड चादर इत्यादीचा वापर करावा.

हिवाळ्यात त्वचा व केसांची काळजी

हिवाळ्यात कोरडेपणा जास्त असतो. याचा परिणाम त्वचा व केस यांच्यावर अधिक होतो. शरीराची त्वचा रुक्ष व निस्तेज होते तर केसांमध्ये कोंड्याचे प्रमाण वाढते. केसगळतीचे प्रमाणदेखील वाढते. अशा वेळी त्वचा व केसांची योग्य काळजी घेतल्यास या समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

१. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये यासाठी मॉइश्चरायझर, बॉडी लोशन यांचा वापर करावा.
२. सकाळी उठल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा.
३. त्वचा अधिक कोरडी पडली असेल तर तेलाचा वापर करावा. याने त्वचा मऊ होते.
४. मुबलक पाण्याचे सेवन करावे ज्याने शरीरातील आद्रता टिकून राहील.
५. फळे व हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाणे.
६. सूर्यनमस्कार व योगासने दररोज नियमितपणे करावीत यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. रुक्षपणा कमी होऊन चेहरा टवटवीत दिसतो.
७. केसांची निगा राखण्यासाठी हिवाळयात केस कोमट पाण्याचेच धुवावेत. अति गरम किंवा अतिथंड पाण्याचा वापर टाळावा.
८. केसांना हलक्या हाताने तेलाने मालिश करावे.
९. केस धुताना मॉइश्चर असलेले शॅम्पू व कंडिशनर वापरावेत.
१०. हिवाळ्यात शक्यतो हेअर ड्रायरचा वापर टाळावा.
११. उन्हात केस मोकळे सोडू नयेत. पूर्णपणे झाकले जातील अशी सोय करावी.
१२. केस वारंवार धुणे टाळावे.
१३. ओठ फुटू नये यासाठी पेट्रोलियम जेली किंवा लिप बाम वापरावा.
१४. त्वचेवर हानिकारक साबण वापरणे टाळावे.

हिवाळ्यात मुबलक पाणी, संतुलित आहार व शरीरात आद्रता टिकून राहील अशा पदार्थांचे सेवन, केस व त्वचा यांचे मॉइश्चर टिकून राहण्यासाठी योग्य प्रयत्न केले की हिवाळा खऱ्या अर्थाने सुखद ऋतू वाटेल व त्याचा त्रास होण्याऐवजी आनंद उपभोगता येईल.
– सरिता सावंत भोसले

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comments (1)

  1. Good article 🙌 quite useful too👍

Comment here