परीक्षा असा शब्द ऐकला तरी पोटात आणि मनात भीतीचा गोळा येतोच. विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जावे लागते. सध्याच जग स्पर्धेचं असल्यामुळे प्रत्येक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना सज्ज राहावं लागतं. सजग राहावे लागते. शिक्षक, आई वडिल यांच्या अपेक्षा, स्वतःच ध्येय, यश या सगळ्या पायऱ्यांवर स्वतःला सिद्ध करण्यासाठी परीक्षेत चांगल्यात चांगले मार्क मिळवून अव्वल यावे लागते.
परीक्षेची ही पायरी सहज पार होत नाही. यात भरपूर कष्ट, चिकाटी,मेहनत,जिद्द, इच्छाशक्ती आणि सर्वात महत्वाचे अभ्यासाची गरज असते. पण हा अभ्यास करताना शरीर आणि मनावर ताण येतोच. या ताण तणावापासून दूर राहण्यासाठी परीक्षा काळात मन व आरोग्य संतुलित राहणे अत्यंत गरजेचे असते. निरोगी शरीर आणि प्रसन्न मन कठिणातील कठीण परीक्षा नक्कीच पास करू शकतात.
बऱ्याचदा परीक्षेत मनावर ताण आल्यामुळे केलेला अभ्यासही लक्षात राहत नाही. आजारपण येते. जेवण कमी जाते. अशक्तपणा वाढतो. कित्येक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ येते. या काळात आरोग्य आणि मानसिक पातळीवर विशेष काळजी घेणे गरजेचे असते. निरोगी आरोग्यासाठी आहाराबाबतीत काही गोष्टी पाळल्या तर आजारपण उदभवणार नाही. परीक्षा काळातील काही आरोग्य संतुलन टिप्स खालीलप्रमाणे :
१) नियमित वेळेवर जेवण करणे
परीक्षा तोंडावर आली की खूप विद्यार्थी अगदी तहान भूक विसरून अभ्यास करतात. दिवसा व रात्रीही जागरण करून अभ्यास करत बसतात. यामुळे त्यांचे जेवणाकडे दुर्लक्ष होते व परिणामी परीक्षा जवळ आली की चक्कर येणे, अशक्तपणा वाढणे, शरीरातील रक्त कमी होणे असे आजार उदभवतात. तहान भूक विसरून जो अभ्यास केला जातो त्याचा अशा वेळी काहीच उपयोग होत नाही त्यामुळे नेहमी परीक्षा काळात नियमितपणे वेळेत जेवण करावे. आहारात पालेभाज्या, फळभाज्या, पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. आहाराच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नये.
२) शक्तिवर्धक पदार्थांचे सेवन करणे
दूध, सुकामेवा, काजू, बदाम, बेदाणे, खारीक अशा शक्तिवर्धक पदार्थांचे सेवन करावे. कडधान्ये, ताजी फळे तसेच घरचेच जेवण, पदार्थ खावे. बाहेरील पदार्थ कटाक्षाने टाळावे.
३) जास्त साखर असलेले पदार्थ खाणे टाळावे
बऱ्याच विद्यार्थ्यांना रात्री जागरण करून अभ्यास करण्याची सवय असते. झोप येऊ नये म्हणून चहा, कॉफी घेण्याची देखील सवय असते. परंतु चहा, कॉफी मध्ये साखर असते व साखरेच्या अति सेवनामुळे स्थूलपणा वाढू शकतो, परिणामी अभ्यासात लक्ष लागत नाही त्यामुळे चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स अशा प्रकारच्या साखरेच्या पदार्थांचे अतिसेवन परीक्षा काळात टाळावे.
४) दररोज न विसरता आठ ते दहा ग्लास पाणी प्या
शरीरासाठी जसा आहार महत्वाचा तसेच पाणीही महत्वाचे आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले तरीही अनेक प्रकारचे त्रास उदभवू शकतात त्यामुळे दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. अभ्यासाला बसताना पाण्याची बॉटल सोबत ठेवणे व ठराविक वेळाने पाणी पिणे. यामुळे मन व शरीर दोन्ही प्रसन्न राहते व अभ्यास चांगला राहतो.
५) सुवर्णसिद्ध जल पिणे
परीक्षा काळात शक्य झाल्यास सुवर्णसिद्ध जल पिणे. सुवर्ण म्हणजे सोने. सुवर्णसिद्ध जल बनवण्यासाठी २४ कॅरट सोन्याचा पत्रा किंवा न वापरलेले सोन्याचे वेढणे पाण्यात उकळत ठेवावे. उकळलेले पाणी थंड झाल्यावर विद्यार्थी व घरातील सर्वांनी प्राशन करावे. सुवर्णसिद्ध जलामुळे प्रतिकारशक्ती वाढते. आकलनशक्ती, स्मरणशक्ती सुधारते व बुद्धी तल्लख होते. केवळ परीक्षा काळात हे पाणी न पिता नियमितपणे याचे सेवन केल्यास अतिउत्तम. विद्यार्थ्यांना आवर्जून पालकांनी द्यावे.
६) तिखट, तेलकट, आंबट, मसालेदार पदार्थ खाऊ नये
परीक्षा काळात रात्री जागरणामुळे किंवा अवेळी जेवणामुळे अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेत जेवण करावे व निदान सहा ते सात तास पुरेशी, शांत झोप जरूर घ्यावी. शांत झोप येण्यासाठी रात्री एक कप पाण्यात दोन चमचे साजूक तूप घालून प्यावे. अपचनाचा त्रास देखील यामुळे उदभवत नाही. अतिचमचमीत, अति तिखट, आंबट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मन व शरीर निरोगी असल्यास अभ्यास उत्तम होऊन यश प्राप्त होते.
७) चेहरा थंड पाण्याने धुवा
सतत पुस्तक वाचनामुळे डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता असते अशा वेळी ठराविक वेळेनंतर चेहरा थंड पाण्याने धुणे. डोळ्यांवरील ताण नाहीसा करण्यासाठी डोळ्यांवर दुधाच्या किंवा गुलाब जलाच्या घड्या ठेवणे. काही काळ डोळे बंद करून डोळ्यांना आराम देणे.
आहार म्हणजे जेवण नीट झाले की शरीराच्या तक्रारी कमी होतात. अशक्त पणा किंवा आळस येणं हे प्रकार जाणवत नाहीत. पोट भरलेले असले की शरीरातील ऊर्जा वाढते व अभ्यास करण्याची इच्छा देखील दृढ होते. सोबतच अभ्यासात मन लागते. पण काहीजणांची तक्रार असते की परीक्षा आली की मनात भीती वाटते, नको नको ते विचार मनात गर्दी करतात, झोप लागत नाही, टेन्शन येत, मन एकाग्र होत नऊ परिणामी अभ्यास करायची इच्छा होत नाही वगैरे वगैरे.
आपण फक्त शरीर सुदृढ ठेऊन नाही चालत तर मन देखील सुदृढ ठेवावे लागते. जितके कष्ट शरीरावर घेतोलकीच मेहनत मन चांगले प्रसन्न ठेवण्यावर घ्यावे लागतात. परीक्षा काळात किंवा कोणत्याही कठीण काळात मन संतुलित नसेल तर हातात असलेले काम पूर्णत्वाला जात नाही व यशही मिळत नाही म्हणून नेहमी मन सकारात्मक ठेवणे फार गरजेचे आहे. यासाठीही काही छोट्या छोट्या गोष्टी, सवयी अमलात आणल्या की आयुष्यातील कोणत्याही परीक्षेला सामोरं जाण्याचं बळ येईल. परीक्षा काळात मन संतुलित राखण्यासाठीच्या टिप्स खालीलप्रमाणे :
१) व्यायाम करणे
मन एकाग्र करण्यासाठी, मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी व्यायामअत्यंत महत्वाचा आहे. व्यायामामुळे मनासोबत शरीर सुद्धा ताजेतवाने राहते. दिवसभर फ्रेश मनाने अभ्यास करता येतो. सकाळी लवकर उठुन काही वेळ जमेल तसा व्यायाम करावा. प्राणायाम करावा.
ध्यानधारणा करावी. रोज सकाळ संध्याकाळ फकीर दहा मिनीतर काढून डोळे बंद करून शांत बसावे, मन श्वासावर केंद्रित करावे. यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.
2) संगीत ऐकणे
शांत संगीत ऐकावे. याने मनावरील ताण बराचसा कमी होऊन मन शांत होते. परीक्षेचे टेन्शन हलके होण्यास मदत होते.
३) चिंतन करणे
सतत पुस्तक समोर न धरता काही वेळ चिंतन करावे. जे काही वाचले असेल त्याची उजळणी शांत डोक्याने करावी.
४) निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे
दिवसातुन दहा मिनिटे तरी निसर्गाच्या सानिध्यात घालवावीत. हिरवा निसर्ग मनाला तजेलपणा देतो. मनावरील मळभ दूर करतो. मन शांत, प्रसन्न आणि निवांत होण्यासाठी झाडा झुडपंसोबत काही काळ नक्की व्यतीत करावा.
५) स्वतःला जे आवडतं ते करा
मनातील नैराश्य, भीती दूर करण्यासाठी स्वतःला ज्या गोष्टी आवडतात जसे संगीत ऐकणे, डान्स करणे, कविता ऐकणे, टीव्ही पाहणे, पेंटिंग करणे यासाठी काही वेळ किंवा फक्त दहा मिनिटे तरी नक्की द्यावी ज्यामुळे भीतीचे विचार मागे सरून सकारात्मक विचाराने पुढील अभ्यास होईल.
६) चांगले विचार ऐकणे व वाचणे
सतत सकारात्मक विचार ऐकावे, वाचावे. सकारात्मक व्यक्तींच्या सान्निध्यात राहावे.
७) नकारात्मक घटनांपासून, व्यक्तींपासून, विचारांपासून लांब राहावे. विनोदी कार्यक्रम पाहावे. सतत हसत राहावे ज्यामुळे मेंदू फ्रेश राहतो. अभ्यास चांगला होतो. जे काही वाचलेले असते ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहते.
८) प्रेरणादायी विचार वाचावे. प्रेरणादायी व्यक्तींना आदर्श मानून त्यांचा चेहरा सतत डोळ्यासमोर ठेऊन प्रामाणिक प्रयत्न करावेत. स्वतः स्वतःचेप्रेरक बनावे. मी हे करू शकत नाही किंवा मला हे जमणार नाही ही नकारात्मक वाक्ये स्वतःपासून कोसो दूर ठेवावीत. मी करणार आणि मी यशस्वी होणारच या मंत्राचा जप तुमच्या आयुष्याचे सोने करू शकतो.
परीक्षा दहावी, बारावीची असो की मग ती आयुष्यातील परीक्षा असो स्वतःवर ठाम विश्वास, सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न यामुळे मन व शरीर दोन्ही संतुलित राहायला मदत होते व परीक्षेत यश नक्कीच मिळते. कुठल्याही परिस्थितीत ‘मी सक्षम आहे’ व ‘मी यशस्वी होणार’ हे मनाशी ठाम पक्क करावं.
अशक्य अस काहीच नसतं. रस्ता कठीण असतो पण पायवाटा आपण तयार करायच्या व विश्वासाने चालायचे, प्रसन्न मनाने केलेला अभ्यास नेहमीच यश मिळवून देते म्हणून आता परीक्षेच्या काळात आधी स्वतःकडे लक्ष द्या, सुदृढ बना मनाने व शरीराने देखील. भरपूर अभ्यास करून भरघोस यश मिळवा. दहावी, बारावी तसेच इतर अनेक परीक्षेसाठी भरपूर शुभेच्छा😊…Best of luck!!!
– सरिता सावंत भोसले
Comment here