आरोग्य

रात्रीचं जागरण सहज टाळता येईल

Night Awakening | Aapli Mayboli

रात्रीचा दिवस करण्यापेक्षा रात्रीला रात्र आणि दिवसाला दिवस म्हणूनच राहू देणं केव्हाही श्रेयस्कर. पर्याय आहे, उपायही आहे, तशी इच्छा मात्र हवी.

काय करू ? रात्रीची जागरणं आम्हाला टाळताच येत नाहीत. आमचा जॉबच असा आहे की रात्रीची झोप आम्हाला कुठून मिळणार ? जागरणांची आता इतकी सवय झाली आहे की कधी लवकर झोपायचा प्रयत्न केला तरी झोप येत नाही. आम्ही सगळी मित्रमंडळी जमतोच मुळी रात्री. त्यानंतर गप्पाटप्पा. प्रत्यक्ष भेटलो नाही तरी गप्पा होतात त्या रात्रीच फोनवर. शिवाय रात्रीचा वेळही भरपूर असतो.

जागरणाची अशी असंख्य कारणं सांगितली जातात. मात्र इच्छा असेल तर त्यावरही उपाय निघू शकतो.

लवकर घरी जायची सवय लावा

रोज रात्री जागरण होत असेल तर आठवड्यातून सुरूवातीला कमीत कमी दोन दिवस तरी लवकर म्हणजे रात्री दहा पर्यंत घरी जाण्याची सवय करा. हळूहळू हे लवकर घरी जाण्याचे दिवस वाढवा.

घरचं जेवण जेवा

रोज रात्री बाहेर खाणं होत असेल तर किमान तीन दिवस (आठवड्यातून) तरी घरी जेवण करा. यामुळे बाहेरच्या खाण्याने शरीरावर होणारे अनिष्ट परिणाम टळतीलच शिवाय पैसे वाचतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांबरोबर जेवणाचा प्रयत्न केला तर घरच्या इतर मंडळींबरोबर आपोआपच संवाद होईल. आई-वडील, भाऊ-बहीण या अगदी जवळच्या व्यक्तींशी तरी आपले मनाचे बंध दृढ हवेतच. शेवटी आपल्या चांगल्या-वाईट प्रत्येक घटनेचे तेच तर वाटेकरी असतात.

टीव्ही व अभ्यास रात्रीचा जागून नकोच

जागून टीव्ही बघणं, अभ्यास करणं या सवयी जाणीवपूर्वक कमी करा. रात्री जागरणाने जो वात वाढतो त्यामुळे माणसाच्या बौद्धिक क्षमतेवरही परिणाम होतो. आकलनशक्ती, धारणाशक्ती, स्मरणशक्ती सगळ्याच कमी होतात. त्यामुळे अभ्यासाच्या मानाने परीक्षेमधलं यश कमी असतं.

गरज असेल तरच जागरण करा

रात्रपाळीची नोकरी किंवा परदेशाशी संबंधित फोन कॉल्स (अर्थात नोकरीशी संबंधित) असतील तर जागरणाला काही पर्यायच नसतो. कारण जागरण नको म्हणून नोकरी तर सोडता येत नाही. मात्र अशा वेळी कमीत कमी हानी होईल हे आपण कसं साध्य करू शकू याचा विचार करा ?

ठरवलेले नियम पाळा

रात्री झोप न मिळाल्यामुळे शरीरात वाढणारे वात व पित्त हे दोष त्रासदायक ठरतात. त्यामुळे सकाळी घरी आल्यानंतर दूध व त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप असे मिश्रण पिऊन मगच झोपा. साधारणपणे 4-5 तासांची झोप झाल्यानंतर उठा व दुपारचे जेवण योग्य वेळी म्हणजेच साधारण 12-1 वाजता घेण्याचीच सवय ठेवा. यामुळे शरीरातील दोष फार कमी जास्त होत नाहीत.

तेलाने मसाज करा

सकाळी अंघोळीच्या आधी डोक्याला व संपूर्ण अंगाला तेल अवश्य लावा. डोक्याला खोबर्‍याचे व अंगाला तिळाचे तेल वापरले तरी चालेल. यामुळे केसांचे तसेच त्वचेच्या समस्या उद्भवणार नाहीत. कोरडेपणा येणार नाही.

तेलकट व तिखट पदार्थ खाणे टाळा

जेवणामध्ये ताजे व साधे पदार्थ घेतले जातील याची दक्षता घ्या. कंपनीत जेवण घेतले जात असेल तर रोज तळलेले पदार्थ वडे, भजी, समोसे खाऊ नका. रोज पापड खाऊ नका. रात्री दही अजिबात नको. जेवणापाठोपाठ लगेच फळ किंवा चहा-कॉफी घेऊ नका. त्यामुळे पचन बिघडते. जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स किंवा डोक्यात चिकट कोंडा होणं, जास्त घाम येणं, घामाचे डाग पडणं, घामाचा उग्र वास येणं, ॲसिडिटी असे त्रास उद्भवू शकतात.

आहारात तुपाचा समावेश करा

घरी जेव्हा जेवण कराल तेव्हा भातावर, पोळीवर थोडेतरी चांगले तूप अवश्य घ्या. त्यामुळे त्वचा, केस, एवढचं नव्हे तर मेंदूही तरतरीत राहण्यास मदत होते. बरेचदा खाण्यात अजिबात तूप नसल्याने पुष्कळ समस्या निर्माण होतात.

रात्रीचे जागरण करू नका, लवकर झोपा

ज्या गोष्टी दिवसा करणं सहज शक्य आहे त्यासाठी रात्री मुद्दाम जागरण करणं टाळा. उदा. इंटरनेट सर्फिंग, मोबाईलवर बोलणं, इ. दिवसा करा. दुपारी न झोपता ही कामं आटोपून रात्री वेळेवर झोपा.

शरीराची योग्य ती काळजी घ्या

आपलं शरीर हे मशीन नाही आणि त्याची वेळेवर घेतलेली काळजी हाच त्याचा मेंटेनन्स आहे याची नेहमी आठवण ठेवा. दीर्घकाळपर्यंत आपल्या शरीरानं निरोगीपणानं आपली साथ द्यावी अशी अपेक्षा असेल तर आपणही त्याची तशीच निगा राखणं गरजेचं आहे. अन्यथा मग ऐन उमेदीच्या काळात, खाण्यापिण्याच्या वयात डायबेटीस, ब्लडप्रेशर, हृदयविकार यांसारख्या व्याधी मागे लागतात.

व्यायाम करा

दिवसभराच्या बिझी रुटीनमध्ये किमान एक तास तरी व्यायामासाठी काढा. व्यायाम म्हणजे जिममध्येच जाऊन करायला हवा असं नाही. जॉगिंग, रनिंग सायकलिंग, स्कीपिंग काहीही चालेल. यामुळे शरीर व मन दोन्ही उत्साही व अधिक कार्यक्षम राहील.

लवकर झोपा आणि लवकर उठा

‘लवकर निजे लवकर उठे. तया स्वास्थ्य व लक्ष्मी लाभे’ असं आपल्याकडे म्हणतात ते अगदी खरं आहे. त्यामुळे चांगल्या सवयी अंगी बाणवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा आणि जगण्याचा स्तर सुधारण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा.

– वैद्य अभय कुलकर्णी, एम.डी. (आयुर्वेद)
– वैद्य राजश्री कुलकर्णी, एम.डी. (आयुर्वेद)

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.