कॅलिग्राफी हे टॅलेंट नसून स्किल आहे, म्हणजे ती शिकून घेण्याची गोष्ट आहे. पुरेशा सरावाने कुठल्याही वयात सुलेखन जमते. भरपुर सराव केल्यावर हाताला वळण येतं. ते आलं की वेगवेगळ्या स्क्रिप्ट शिकणे कठीण नसते. जेवढे जास्त प्रयोग तितकं कौशल्य वाढत जातं.
कॅलिग्राफी साठी कुणी आपल्याला पैसे देऊ करणे ही खरी आणि शेवटची परीक्षा आहे. मग त्यानंतर तुम्ही कसे शिकलात यावर काही अवलंबून नसते. चला तर मग पाहुयात स्वतःहून कॅलिग्राफी शिकण्याच्या ५ सोप्या पायऱ्या :
एक
ब्रश पेन, पॉईंटेड पेन, ब्रॉड एज या तीन प्रकारची कॅलिग्राफी असते. तुम्हाला नक्की काय शिकायचं आहे ते ठरवून घ्या
दोन
आपल्याला हवी ती कॅलिग्राफी करण्यासाठी काय साहित्य लागेल हे निश्चित करा. सुरुवातीपासून चांगल्या क्वालिटीचे साहित्य वापरल्याचा परिणाम चांगला होतो. शिकताना लागलेल्या सवयी कायमस्वरूपी रहातात.
तीन
स्वतःसाठी अभ्यासक्रम बनवा, म्हणजे आपण सराव कसा करणार आहोत हे एके ठिकाणी लिहून काढा. आणि या अभ्यासक्रमात माईलस्टोन ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर प्रगती तपासता येईल. लक्ष्य खूप मोठं आहे, ते छोट्या तुकड्यात विभागल्यामुळे गाठणं सोपं होतं.
चार
भरपुर सराव करा. हा सराव म्हणजे फक्त वर्कशीट गिरवणे नव्हे, तुम्हाला आवडेल त्या आकाराची नक्षी बनवा. बेसिक स्ट्रोक वापरून वेगवेगळ्या डिझाईन तयार करा. अतिशय आरामदायी ठिकाणी बसून गाणी ऐकत सराव करा. म्हणजे लय सापडते आणि कंटाळा येत नाही.
पाच
तुम्हाला स्वतःचं अक्षर आवडायला लागले की छोटे प्रोजेक्ट घ्या, तुमच्या मित्रांची नावं लिहा, कुणाला पत्र पाठवा, किंवा कविता लिहून फोटो काढून सोशल मीडिया वर पोस्ट करा आणि सर्वांच्या प्रतिक्रिया बघा. आणि हे नियमित सुरू ठेवा. आपलं अक्षर आपल्याला आवडत नाही तोवर सराव सोडायचा नाही.
– शितलतारा ( https://www.instagram.com/sheetaltara21 )
Comment here