मिसळ म्हंटल की तोंडाला पाणी सुटणार नाही असा महाराष्ट्रीयन व्यक्ती नाही. लाल भडक झणझणीत तर्री, पाव किंवा ब्रेड, भुरभुरायला मस्त कांदा, पिवळी धम्मक शेव, फरसाण, हिरवी गार कोथिंबीर, रसदार लिंबू अहाहा ! फक्त वर्णनानेच डोळ्यासमोर मिसळ उभी राहिली न तोंडाला पाणी सुटले. घरी मिसळ बनवता येत असली तरी बाहेर हॉटेल मध्ये मिळत असलेल्या मिसळीचे खास वैशिष्ट्य असते व प्रत्येक ठिकाणच्या मिसळीच्या चवीची वेगळी खासियत असते. आणि या चवीमुळे ते ते ठिकाण किंवा हॉटेल फक्त मिसळ साठी प्रसिद्ध असते.
आज आपण पुण्यातील अशीच मिसळ स्पेशल प्रसिद्ध ठिकाणे पाहणार आहोत. पुणेरी मिसळ भारतात व भारताबाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे. पुण्यात आलात आणि मिसळ नाही खाल्ली असं होऊच नये त्यातही प्रसिद्ध मिसळीची चव तर चाखलीच पाहिजे. जे पुण्यात स्थायिक आहेत त्यांना प्रसिद्ध मिसळ कुठे मिळते हे काही सांगायला नको पण जे बाहेरून पुण्यात येतात त्यांच्यासाठी हा खास लेखप्रपंच. पुण्यातील या प्रसिद्ध ठिकाणची मिसळ अजिबात खायला विसरू नका (famous misal in pune).
इथे मिळते झक्कास पुणेरी मिसळ :-
१) बेडेकर मिसळ
बेडेकर मिसळ हा व्यवसाय दामोदर दत्तात्रय बेडेकर यांनी १९५५ पासून सुरू केला आहे व आता 2023 मध्येही तो अधिक जोमाने सुरू आहे. इथे विविध प्रकारची मिसळ तर मिळतेच पण इथलं वैशिष्ट्य हे आहे की मिसळ सोबत तुम्हाला इथे ब्रेडचे स्लाईस मिळतात. दिसायला लाल भडक आणि चवीला भन्नाट व गोड ही या मिसळीची खासियत आहे.
अलीकडेच बेडेकर मिसळ यांनी त्यांची ready to eat misal सेवा सुरू केली आहे ज्यात त्यांचा मिसळ मसाला, फरसाण हे सगळे साहित्य मिळते. तुम्हाला फक्त घरी जाऊन दिलेल्या कृतीप्रमाणे मिसळ बनवायची व घरच्या घरी या मिसळचा स्वाद घ्यायचा आहे. पण तरीही इथे येऊन मिसळ खाण्यात वेगळीच मजा आहे. मिसळ सोबत दिलं जाणारं फरसाण ते स्वतः बनवतात. बेडेकर मिसळीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध सेलिब्रिटीजना देखील या मिसळचे वेड लागले आहे. चवीची, शुद्धतेची व सोबत एक कप चहाची इथे १००% हमी मिळते तेव्हा ही पुण्याची बेडेकर मिसळ खायला विसरू नका.
पत्ता :- मुंजाबा बोळाचा बोळ, नारायण पेठ, पुणे.
२) श्रीमंत मिसळ
पुण्यातील श्रीमंत मिसळ ही one of the best मिसळ मानली जाते. विविध प्रकारच्या मिसळ सोबत इथे मिसळ सर्व्ह करण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. खास पितळीच्या भांड्यात मिसळ दिली जाते व त्या सोबतच शेंगदाणे लाडू, दही, तळलेले शेंगदाणे, कढी, बटाटेवडे, काकडी, पापड असे श्रीमंत ताट दिले जाते. श्रीमंत मिसळ नावाप्रमाणेच श्रीमंत व खायला झणझणीत तिखटजाळ असते.
याठिकाणी भरपूर गर्दी असते त्यामुळे वाट बघायला लागते इतकंच काय ते पण फेमस मिसळ साठी थोडी वाट पाहायला काय हरकत नाही का! तर श्रीमंत मिसळ आवर्जून ट्राय करा.
पत्ता :- अभिमनश्री सोसायटी रोड, IDBI बँक जवळ, औंध, पुणे
३) सर मिसळ
सर मिसळ इथे चीज मिसळ, दही मिसळ, भाकरी मिसळ, कॉर्न मिसळ, जैन मिसळ अशा वेगवेगळ्या मिसळ खायला मिळतात. येथील मिसळ मसाला ते स्वतःच बनवत असल्याने इथली खास चव इतर कुठेही तुम्हाला मिळणार नाही. पोट आणि मन दोन्ही खुश करायला सर मिसळ येथील दाटदार मिसळ नक्की चाखायला हवीच.
पत्ता :-अलंकार भवन, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे
४) काटाकिर्रर्रर्र मिसळ
कर्वे रस्त्यापासून आत मिळणारी ही मिसळ नावाप्रमाणेच काटा किर्रर्र आहे. ज्या मिसळप्रेमीना पुण्यात राहून कोल्हापुरी मिसळीची चव चाखायची असेल तर काटाकिर्रर्रर्र मिसळ नक्कीच खायला हवी. इथे तीन प्रकारची वेगवेगळी मिसळ मिळते. मिसळ खाऊन समाधान मिळेल अशी झक्कास मिसळ म्हणजे काटाकिर्रर्र मिसळ. इथे देखील मिसळ मसाला स्वतःच बनवत असल्याने या मिसळीची चव आणि रंग इतर ठिकाणी मिळणे केवळ अशक्य. तर ही खास चव चाखायला नक्की या.
पत्ता १:-डॉ. केतकर रोड, भोंडे कॉलनी, कलमाडी शाळेच्या जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे
पत्ता २ : कमिन्स कॉलेज रोड, कर्वे रोड, पुणे
५) श्रीकृष्णभुवन मिसळ
पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबागेत जाऊन फेमस श्रीकृष्णभवन मिसळ नाही खाल्ली तरचं नवल! अगदी जीव ओवाळून टाकावा इतकी जबरदस्त चव येतील मिसळला असते. त्यांचा मसाला unique असतो. टोमॅटो व नारळाच्या वेगळ्याच वाटणातून ही दाटसर मिसळ तयार होते. याची चव दुसरी कुठेही तुम्हाला मिळणार नाही. अति तिखट नाही व अगदीच गोड नाही. आंबट गोड अशी व खावीशीच वाटत राहावी अशी अफलातून श्रीकृष्ण भवन मिसळ नक्की खायला हवीच.
पत्ता :-तुळशीबाग, बुधवार पेठ रोड, पुणे.
६) साईछाया मिसळ
मिसळला गावरान तडक्याची चव पाहिजे असेल तर साईछाया मिसळ नक्की खाल्ली पाहिजे. अनेक सेलिब्रिटी इथली मिसळ खाऊन तृप्त होऊन जातात व परत परत येतातच. दही मिसळ, चीज मिसळ, बटर मिसळ असे विविध प्रकार इथे मिळतात. स्पेशल काळ्या मसाल्यात मिसळीची तर्री बनवली जाते. फरसाण देखील खास मिसळ साठी वेगळे बनवून घेतले जाते. मिसळ वर पोहे न वापरता चिवडा वापरला जातो. सोबत स्वादासाठी पापड दिला जातो. काळ्या मसाल्यामुळे ही मिसळ वेगळी चव देते व निराळी ठरते. स्पेशल अशी ही साई छाया मिसळ खायला विसरू नका.
पत्ता १ :- हिराबाग चौक, क्षेत्रीय कार्यालयाजवळ, टिळक रोड, पुणे.
पत्ता २ : A/P वेळू, पुणे-बंगलोर महामार्ग, शिवापूर, पुणे.
Comment here