प्रेरणादायी

सन्मित्र – नव्या युगातला गुरू

Sanmitra-A preceptor in the new era | Aapli Mayboli

जवळजवळ चार-पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे, पण आजसुद्धा मनावर त्याचा प्रभाव अगदी ताजा आहे.

एक रम्य संध्याकाळ

एका शनिवारची रम्य संध्याकाळ. शहराच्या त्या प्रतिष्ठित क्लबमध्ये आम्हा मित्रांचे हास्यविनोद चालू होते. वेगवेगळ्या व्यवसायात आणि क्षेत्रात काम करणारी आम्ही मित्रमंडळी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी तेथे जमतो. साधारण दहा वर्षं हा शिरस्ता चालू आहे. त्यात खंड नाही. इकडचं तिकडचं समजतं. आपापल्या क्षेत्रातली सुखदुःखं एकमेकांना सांगता येतात. चार नव्या गोष्टी कानावर पडतात. थोड्या गप्पाटप्पाही होतात.

अशाच आमच्या गप्पा चालू होत्या. आमच्या शेजारच्या टेबलावर बसलेल्या दोघांकडे माझं लक्ष गेलं. एक बावीस-चोवीस वर्षांचा तरुण मुलगा. चमकदार डोळ्यांचा आणि त्याच्यासमोर पन्नास- पंचावन्न वर्षांचा प्रसन्न आणि अत्यंत प्रगल्भ चेहऱ्याचा एक माणूस. अत्यंत मग्न असे दोघेही, एकमेकांशी बोलण्यात पुरते बुडून गेलेले. आसपास कुठे काय चाललंय याची त्यांना बिलकुल फिकीर नव्हती. दोघंही एकमेकांसोबत नजरेच्या घट्ट धाग्यांनी पक्के बांधलेले.

कुतूहल, अस्वस्थता, उत्सुकता

माझं कुतूहल जागं झालं. आमच्या गप्पा जोरात चालू असतानाही मी निरीक्षण करीत राहिलो. जस जसं मी पाहत राहिलो तस तसं मी त्यांना पाहण्यात मी गुंगून गेलो.

हे दोघं कोण असतील? यांचं नातं काय? ते इथे का बसलेत ? कुठल्या गहन विषयांवर त्यांचं बोलणं चालू आहे? – असे प्रश्न माझ्या मनात रुंजी घालू लागले. माझी अस्वस्थता, उत्सुकता वाढतच गेली.

त्यानंतर थोड्या वेळानं चमकदार डोळ्यांचा तो तरुण उठून गेला. त्यांच्यातला मोठा माणूस एकटाच कॉफी किंवा चहा पीत बसून राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आता प्रगल्भतेबरोबर थोडे समाधानाचे भाव होते.

सन्मित्र किंवा गुरुमित्र

माझी उत्सुकता शिगेला पोचली. शांत राहण्याची शक्ती संपली. न राहवून मी त्या टेबलावर गेलो. माझी ओळख करून दिली आणि सर्व चातुर्य पणाला लावून, औपचारिकतेचे बंध शिताफीनं सोडवून थेट विषयालाच हात घातला आणि बिनधास्त विचारलं, तुम्ही दोघं कोण आहात? तुमची हरकत नसेल तर तुम्ही काय बोलत होतात हे मला सांगाल काय?

असं विचारल्याबरोबर तो स्वच्छ, मोकळा हसला आणि थोडं थांबून म्हणाला, ‘मी त्याचा सन्मित्र, गुरुमित्र आहे.’ मी थोडा विचार करेपर्यंत तो पुढे म्हणाला, ‘त्याचं नाव विनीत. इथल्या एका अत्यंत मोठ्या उद्योगपतीचा अतिशय गुणी मुलगा. त्यानं आत्ताच उद्योगात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. त्याला रोज येणाऱ्या अडीअडचणी किंवा अनुभवांविषयी तो माझ्याशी बोलतो. मला जे वाटतं ते मी त्याला सांगतो. अगदी खरं. कुठलाही आडपडदा न ठेवता. मोकळेपणानं ‘

‘त्याच्या प्रश्नांची उत्तरं देणं हे माझं काम नाही,’ तो पुढे म्हणाला, ‘एक अनुभवी मन आणि उत्सुक कान देणं मी करतो. थोडेच पण मार्मिक प्रश्न विचारणं हे मात्र माझं कौशल्य आहे. कधी मीही त्याला कोडी घालतो. तो मग त्याच्या दृष्टीनं बरोबर असलेली उत्तरं मला पुढच्या वेळी सांगतो. पुढच्या शनिवारी. आमचा शनिवार ठरला आहे. दर शनिवारी संध्याकाळी सहा. जागा हीच. टेबलही हेच. ‘

मला गंमत वाटली. मागच्या महिन्याच्या शनिवारी ही दोघं मला कशी दिसली नाहीत याचा मी विचार करीत राहिलो. सन्मित्र, गुरुमित्र या शब्दांचंही मला खूप अप्रूप वाटलं.

गरज सन्मित्राची किंवा गुरुमित्राची

प्रत्येक माणसाला, मग तो आयुष्याच्या किंवा करिअरच्या कुठल्याही टप्प्यावर असो, अशा सन्मित्राची किंवा गुरुमित्राची गरज लागते. असा सन्मित्र, गुरुमित्र जो फक्त मार्गदर्शक नाही, कारण मार्गदर्शनात एक अलिप्तपणा, कोरडेपणा असतो, किंवा सल्लागारही नाही जिथे फारसं गांभीर्य नसतं.

पुढचा महिनाभर मी यावर विचार करीत राहिलो आणि मग तेच दृश्य, तेच टेबल, तीच वेळ, तेच दोघं.

यावेळी विनीत टिपणं काढत होता. लिहिता लिहिता बोलत होता. दोघंही थोडे गंभीर होते. चमकदार डोळ्यांचा विनीत गेला आणि मीही पुन्हा तिथं जाऊन बसलो.

‘सन्मित्र किंवा गुरुमित्र म्हणजे काय हो?’ गेला महिनाभर मनात ठेवलेला प्रश्न मी विचारला.

‘मेण्टरिंग असा एक इंग्रजी शब्द आहे. त्याच्या जवळपास जाणारे मराठी शब्द आहेत.’ पुढे त्यांनी आपण चांगलं मराठी कसं लिहिलं, बोललं पाहिजे यावर सांगितलं आणि म्हणाले, ‘हा सन्मित्र शिक्षक किंवा प्रशिक्षकही नसतो. कारण त्यात फार हाताला धरून शिकवण्याचा भाग असतो. पण सन्मित्र किंवा गुरुमित्र हा सत्य, खरं सांगणारा, तरीही आपली मतं न लादणारा असतो. हे एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. ज्याला आयुष्यात काही करायचं आहे, ज्याच्या मनात काही जबर आकांक्षा आहे, त्याला अशा सन्मित्राची फार फार गरज असते. ‘

सन्मित्र – नव्या युगातला गुरू

बदलत्या आणि अत्यंत स्पर्धात्मक जगात अशा सन्मित्र माणसाची, गुरुमित्राची गरज वादातीत आहे. गुरू, पण जो मित्रासारखा वागतो. मार्गातले धोके सांगणारा, स्वच्छ, प्रांजळ मतं मांडणारा, पण मतं न लादणारा. छोट्या युक्त्या सांगणारा असा सन्मित्र. नव्या युगातला गुरू ज्याची आठवण आपण गुरुपौर्णिमेला ठेवलीच पाहिजे असा.

पुढे मग त्या दोघांशीही माझी फार चांगली दोस्ती झाली. चमकदार डोळ्यांचा तरतरीत मुलगा विनीत आणि तो प्रगल्भ सन्मित्र अजूनही दर शनिवारी भेटतात.

गेल्या पाच वर्षांत औद्योगिक क्षेत्रात चमत्कार वाटेल अशी प्रगती विनीतनं केली आहे.

आणि त्या प्रगल्भ सन्मित्राला त्या कंपनीतल्या मुख्य व्यवस्थापकापेक्षाही जास्त मानधन आहे.

– अनिल शिदोरे

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here