काही माणसांना फक्त स्वप्ने पाहण्यात आनंद असतो, ते फक्त स्वप्न पाहतात आणि ती पाहत म्हातारी होतात.. या असल्या स्वप्नांना काय अर्थ?
तीन प्रकारची माणसं असतात
पहिला प्रकार म्हणजे ज्यांना आयुष्यात काहीही करायचं नसतं. नुसती मजा करायची असते. आयुष्य भोगायचं असतं. त्यांना सोडून देऊ. त्यांचा त्यांचा एक आनंद असतो. आज काय क्रिकेटची वन-डे मॅच म्हणून आनंद. उद्या काय मित्राचं लग्न ठरलं म्हणून पार्टी तर परवा काय कॉलेजात ‘ट्रॅडिशनल डे’ म्हणून आनंद. खाण्यात, मौज-मजा करण्यात, मनाचे, शरीराचे चोचले पुरवण्यातला आनंद. हा आनंद एक प्रकारचा.
दुसऱ्या प्रकारची माणसं असतात स्वप्नाळू त्यांना स्वप्नात, स्वप्न पाहण्यात आनंद असतो. कुणाला बिल गेट्स व्हायचं असतं. कुणाला राजकारणात मोठं नाव मिळवावं असं वाटत असतं. काहींना वाटतं आपण सतत प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात असावं. लोकांनी आपल्याकडे पाहावं, टाळ्या वाजवाव्यात, सर्वत्र आपलं नाव व्हावं. यांची स्वप्नं फार मोठी असतात; पण त्यासाठी त्यांना करायचं काहीही नसतं. त्यांना नुसती स्वप्नं पाहायची असतात. स्वप्न पाहण्यातच त्यांचा बहुतांश वेळ जातो, ऊर्जा खर्च होते आणि मग ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी लागणारी ताकद शिल्लकच राहत नाही.
साधारण साठ किंवा सत्तर टक्के लोक पहिल्या प्रकारात मोडतात. साधारण तीस एक टक्क्यात दुसऱ्या प्रकारची माणसं येतात. पण केवळ एक टक्का लोक वेगळी असतात. तर आपण पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ही माणसं अविरत धडपड करत असतात…. तुम्ही ह्या एक टक्क्यात जायला हवं; असं वाटतं का..?
ही एक टक्कावाली माणसं शांत असतात. सतत स्वत:वर काम करत असतात. रोज स्वत:चं स्वप्न घेऊन कवटाळून बसत नाहीत. आपण कुठे कमी पडतो आहोत, आपण नवीन काय शिकायला पाहिजे, कुणाकडून शिकायला पाहिजे याचा ध्यास ही माणसं सतत घेत असतात. अस्वस्थ असतात ही माणसं; पण अशांत नव्हे. ह्यांचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती, प्रत्येक पाऊल हे त्यांच्या ध्येयाकडेच जाणारं असतं, निश्चित.
रोजच्या रोज नवनव्या गोष्टी शिकण्याकडे त्यांचा कल असतो, तसा दमदार प्रयत्न असतो. ही माणसं स्वप्न गोंजारत बसत नाहीत, तर छिन्नी, हातोडा घेऊन स्वत:वर काम करत राहतात, स्वतःला घडवत राहतात. पण तुम्ही विचारा हे काम करायचं कसं..?
स्वतःला घडवत राहा.
एक रस्ता पकडा. पुन्हा पुन्हा तो बदलू नका. नव्या नव्या गोष्टी शिकत राहा. काम करत राहा. माझं स्वप्न केव्हा, कुठल्या तारखेला पूर्ण होईल ह्याचा फार विचार करत बसू नका. चालल राहा, पुढे जात राहा. मनात स्वत:वरचा पक्का, ठाम विश्वास असू द्या. काम करत राहा. चालत राहा.
त्यासाठी करायचं काय?
तुमचा स्वतःचा वेळ हा खूप मोठा ठेवा आहे तुमचा. तो योग्यरीतीनं अत्यंत काळजीपूर्वक वापरा. पण म्हणून अति धावत बसू नका. वेळेचा उपयोग म्हणजे जास्त घासत राहणं नव्हे, तर योग्य प्रकारे घासत राहणं, वेळेच्या व्यवस्थापनात झोप कमी करू नका. एक-तृतीयांश वेळ विश्रांती हवीच हवी. आठ तासांची शांत, सुंदर झोप तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिग्विजय करायला पुरेशी मानसिक आणि शारीरिक ताकद देते. तुम्हाला माझं हे म्हणणं मुळीच पटत नाहीये हे मला माहीत आहे; पण एक कालातीत सत्य मी तुम्हाला सांगितलंच नाही असं नको.
व्यायाम करा
दोन्ही तिन्ही प्रकारचा व्यायाम. शारीरिक व्यायम न चुकता, रोज त्याच वेळी, ठराविक ठिकाणी. तसाच बौद्धिक व्यायामही तेवढाच महत्त्वाचा. वाचन आहे. प्रॅक्टीस आहे – सराव. आपल्या क्षेत्रातल्या मोठ्या माणसांना भेटणं, त्यांच्या संगतीत राहणं आहे. नवी नवी कौशल्यं शिकणं आहे. हा सारा बौद्धिक व्यायाम. मग मानसिक व्यायाम आहे. अगदी आध्यात्मिक व्यायामही आहे; पण त्यावर पुन्हा कधीतरी; पण व्यायाम, सराव अत्यंत महत्त्वाचा.
गुरुही महत्त्वाचा
स्वत:वर काम स्वतःच करायचं हे जरी खरं असलं तरी योग्य मार्गदर्शन तितकंच आवश्यक आहे. शिकवणी नाही, मार्गदर्शन. तुम्ही म्हणाल असं मार्गदर्शन करणारी माणसंच नाहीत. तसं नाही. अशी माणसं असतात, आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे असे गुरु शोधण्याची फक्त गरज आहे.
छिन्नी, हातोडा घेऊन स्वत:वर काम करत राहण्यासारखी सुंदर, तरल गोष्टच नाही. त्यात रमून जा. बस्स. तुमचं स्वप्न आपोआप पुरं होईल पहा.
– अनिल शिदोरे
Comment here