आरोग्यदायी मॉकटेल्स : उन्हाळा सुरू झाला की उष्णता वाढते. सतत तहान लागते व तहान भागवण्यासाठी अर्थातच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत केवळ पाणी न पिता कोल्ड्रिंक्स, सरबत, ज्यूस अशा अनेक शीतपेयांकडे वळतात. बाहेर मिळणारे सगळेच कोल्ड्रिंक्स, सरबत किंवा ज्यूस हे आरोग्यासाठी हितकारक नसतात. सतत कृत्रिम शीतपेयांचा वापर करणे म्हणजे भविष्यात विविध आजारांना आमंत्रण देणे होय.
उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप गरज असते. शरीर हायड्रेटेड राहणे गरजेचे असते त्यासाठी नेहमी बाहेरची शीतपेय न घेता घरच्या घरी आरोग्यदायी असे ज्यूस, मॉकटेल्स बनवू शकता ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच स्वस्थ देखील राहील. (Healthy Mocktails for Summers in Marathi).
विशेषकरून लहान मुले बाहेरचे आईस्क्रीम, ज्यूस,कोल्ड्रिंक्स या दिवसात जास्त प्रमाणात सेवन करतात त्यांच्यासाठी घरी मॉकटेल्स बनवून दिल्यास त्यांच्या शरीरासाठी देखील योग्य राहील व उन्हाळ्यात डिहायड्रेशन, उलटी, जुलाब वगैरे जे त्रास होतात ते होणार नाहीत. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहील.
हेही वाचा : भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी वरदान
हे पौष्टिक मॉकटेल्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण पिऊ शकतात. शुद्ध फळांपासून घरच्या स्वच्छ वातावरणात हे आरोग्यदायी मॉकटेल्स बनवल्यामुळे ते शरीराला हितकारक असतात. मॉकटेल हे एक हायड्रेटिंग व रिफ्रेशिंग ड्रिंक असल्यामुळे ते हेल्दी आहे व सगळ्यांना आवडते. आज आपण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे सोपे व पौष्टिक मॉकटेल्स पाहणार आहोत. (Easy Healthy Mocktails Receipes for Summers in Marathi).
१) वॉटरमेलन फेस्का
कलिंगडचे हे मस्त रिफ्रेशिंग मॉकटेल्स बनवण्यासाठी पुढील साहित्य लागेल :-
– चार कप कापलेले कलिंगड,
– पाव कप पाणी
– छोटा चमचा आले (आवडीनुसार)
– कोथिंबीर गार्निशिंगसाठी
– पुदिना पाने
कृती :-
प्रथम पॅन मध्ये आले व पाणी घेऊन हे मिश्रण उकळून घ्या. काही वेळाने मिश्रण थंड झाले की गाळून घ्या. आता आल्याचा हा काढा व कलिंगडचे काप मिक्सरमधून मिक्स करून घ्या. एकजीव झाले की ग्लास मध्ये काढून त्यावर कोथिंबीर, पुदिना (आवडीनुसार) घालून गार्निश करा. गरज असल्यास किंवा आवडत असल्यास बर्फ घालू शकता. या थंडगार वॉटरमेलन फेस्कामध्ये पोटॅशियम असते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते . तर लहान मुलांना आवर्जून हे मॉकटेल द्या😊.
२) ऍपल मॉकटेल
साहित्य :-
– १ कप सफरचंद रस
– १ टीस्पून आले/ अद्रक
– २ बारीक कापलेले सफरचंद
– बर्फाचे तुकडे (सर्विंग साठी)
– 2 दालचिनी तुकडे
– १ कप चमकणारे पाणी (sparkling water)
कृती :-
एका मोठ्या बाऊलमध्ये सफरचंद रस, किसलेलं आले, पाणी व सफरचंदाचे तुकडे घेऊन हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या. चार तास फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना बर्फाचे तुकडे व दालचिनी तुकडे घाला. याला apple ginger punch असेही म्हणतात. हे हेल्दी ड्रिंक ग्लास मध्ये भरून सर्व्ह करा. दिवसभर ताजेतवाने ठेवणारे हे ड्रिंक सगळेजण पिऊ शकतात.
३) किवी मॉकटेल
साहित्य :-
– दोन किवी
– अर्धा लिंबू
– चार पाच पुदिन्याची पाने
– १ चमचा पिठीसाखर
– अर्धा ग्लास सोडा
– बर्फाचे तुकडे
कृती :-
एका भांड्यात किंवा ग्लासमध्ये किवीचे तुकडे घेऊन त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. यात पिठीसाखर,पुदिन्याची पाने व मीठ घालून मिक्सरमधून एकजीव करून घ्या. हे मिश्रण एकजीव झाले की यात बर्फाचे तुकडे व सोडा घालून नीट मिक्स करून घ्या. पुदिन्याची पाने टाकून गार्निश करा व सर्व्ह करा.
४) ऑरेंज मॉकटेल
साहित्य :-
– चार चमचे ऑरेंज ज्यूस
– एक टेबलस्पून रोज सिरप
– बर्फाचे तुकडे
– मीठ चवीनुसार
– सोडा वॉटर आवडीनुसार/गरजेनुसार
– एक टीस्पून लिंबू रस
कृती :-
एका ग्लासमध्ये ऑरेंज ज्यूस, रोज सिरप, लिंबू रस, मीठ घालून मिक्स करा. बर्फाचे तुकडे व गरजेनुसार सोडा वॉटर घालून सर्व्ह करा.
५) मोईतो मॉकटेल
हे सर्वांचे आवडते व प्रसिद्ध असे मॉकटेल आहे जे तुम्ही घरीही बनवू शकता.
साहित्य :-
– पाव वाटी पुदिन्याची पाने
– चार टीस्पून लिंबू रस
– पिठीसाखर आवडीनुसार
– बर्फाचे तुकडे
– मीठ चवीनुसार
– सोडा वॉटर गरजेनुसार
कृती :-
ग्लासमध्ये पुदिन्याची पाने चिरून त्यावर बर्फाचे तुकडे घालावे. यावर लिंबू रस,मीठ, आवडीनुसार साखर घालून गरजेनुसार सोडावॉटर घालून चांगले एकजीव करावे. पुदिन्याची पाने टाकून गार्निश करून सर्व्ह करावे.
६) पाईन ऍपल ऑरेंज मॉकटेल :-
लहान मुलांच्या अतिशय आवडीचे व शरीराला थंडावा देणारे हे पौष्टिक मॉकटेल बनवायला देखील खूप सोपे आहे.
साहित्य :-
– एक कप अननस ज्यूस / रस
– पावकप संत्री ज्यूस/ रस
– एक चमचा वाटलेले धणे
– एक चमचा मध
कृती :- एका मॉकटेल/ कॉकटेल शेकर मध्ये बर्फाचे तुकडे टाकून त्यावर अननस रस व संत्री रस घालावा. यामध्ये वाटलेले धने व मध घालून चांगले शेक करून एकजीव करून घ्यावे. ग्लास मध्ये ओतून पुदिन्याची पाने घालून गार्निश करावे व सर्व्ह करावे. उन्हाळ्यातील थकवा दूर करणारे हे मॉकटेल नक्की करून बघा.
७) स्ट्रॉबेरी लेमेनेड
हे सुद्धा तुमच्या शरीराला छानसा थंडावा देणारे एक पौष्टिक असे मॉकटेल आहे.
साहित्य :
– तीन स्ट्रॉबेरी (तुकडे)
– एक कप जिंजर जल
– एक कप लिंबू पाणी
– अर्धा कप बर्फाचे तुकडे
कृती :-
प्रथम जिंजर जल बनवण्यासाठी एका पॅन मध्ये दीड कप आले दोन कप पाण्यात ४५ मिनिटे शिजवून घ्यावे. हे पाणी गाळणीने गाळून घेऊन पुन्हा पॅन मध्ये टाकून त्यात एक कप साखर व चिमूटभर मीठ टाकून एकजीव करून घ्यावे. आता स्ट्रॉबेरी लेमेनेड बनवण्यासाठी लिंबू पाणी, जिंजर जल, स्ट्रॉबेरी तुकडे व बर्फ कॉकटेल शेकर मध्ये नीट शेक करून एकजीव करून घ्यावे. तयार स्ट्रॉबेरी लेमेनेड ग्लास मध्ये घेऊन वरून स्ट्रॉबेरीने सजवून सर्व्ह करा.
हे घरगुती मॉकटेल उन्हाळ्यात शरीराला फ्रेश तर ठेवतात पण बाहेरील शीतपेयांमुळे शरीराला जो काही धोका होतो तो टळतो. घरचे सात्विक व सुलभ असे हे मॉकटेल लहान मुलांनाही खूप आवडतात. उन्हाळ्यात शरीराची काळजी घेण्यासाठी, शरीराला थंडावा मिळण्यासाठी व ताजेतवाने राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी हे मॉकटेल्स नक्की करून बघा व तुमच्याकडे काही नवीन रेसिपीज असतील तर नक्की सांगा.
हेही वाचा : उन्हाळ्यात थकवा दूर करणारे पाच सोप्पे सरबत
जाहिरात : तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा फक्त रु. 4999/- मध्ये
Comment here