१ मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र दिन‘ म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तसेच कामगार दिनही याच दिवशी असतो. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. सध्याची पिढी ही सार्वजनिक सुट्टी आनंदाने एन्जॉय करत असते पण का महाराष्ट्र दिन साजरा होतो? का या १ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर असते? याबद्दल फार फार तर वीस टक्के व्यक्तींना पूर्ण माहिती असेल. (Maharashtra Din information in Marathi)
महाराष्ट्राचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्र, महाराष्ट्र स्वतंत्र होण्यासाठी कितीजणांनी बलिदान दिले याबद्दल फार कोणाला माहीत नसेल आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला गेला नसेल. आपला महाराष्ट्र आपला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत, महात्मे, थोर योद्धे, राज्यकर्ते यांचा वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र ‘संयुक्त महाराष्ट्र’ का, कसा व कधी झाला याची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. (Importance of Maharashtra Din in Marathi)
संयुक्त महाराष्ट्र कसा झाला? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास
१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक राज्ये एकवटून देशाच्या कारभारासाठी राज्य व्यवस्था स्थापन करावी लागली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्ये मुंबई राज्यात विलीन झाली. प्रामुख्याने गुजराती व मराठी, कोकणी भाषिक महाराष्ट्रात अधिक होते. भाषावार प्रांत निर्मितीची मागणी त्या काळात अधिक जोर धरू लागली.
गुजराती भाषिक स्वतःच्या वेगळ्या राज्यासाठी लढत होते तसेच मराठी भाषिक देखील स्वतंत्र प्रांतासाठी लढत होते. महाराष्ट्र स्वतंत्र राज्यासाठी आंदोलने करत होता. महाराष्ट मुंबई सहित संयुक्त व्हावा ही मुख्य मागणी होती. राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबईसह महाराष्ट राज्य स्वतंत्र करण्याचे नाकारले होते.
१९५६ मध्ये राज्य पुनर्गठन अधिनियमानुसार भाषेच्या आधारावर भारतातील राज्यांच्या सीमा निश्चित केल्या गेल्या. १९५६ मध्ये तात्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाच वर्षांसाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. त्यानंतर लोकसभेने मुंबई राज्याचा प्रस्ताव मंजूर केला. मार्च १९६० मध्ये लोकसभेने महाराष्ट्र राज्याचा ठराव मंजूर केला.
एका महिन्यानंतर कनिष्ठ सभागृहात मुंबई राज्याचा ठराव मंजूर झाला आणि १ मे १९६० रोजी मुंबई राज्यधानीसह महाराष्ट राज्याची निर्मिती झाली. या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून १ मे महाराष्ट दिन महाराष्टात जल्लोषात साजरा केला जातो.
महाराष्ट राज्य स्वतंत्र करण्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चा झाले. या लढाईत अनेक आंदोलकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देखील दिली. १०६ आंदोलकांनी महाराष्ट्र राज्यासाठी बलिदान दिले त्यांचे १ मे रोजी स्मरण केले जाते.
१०६ आंदोलकांचा लढा
१९५६ साली राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्टास देण्यास नकार दिल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले. या निर्णयाविरुद्ध सरकारचा निषेध करण्यासाठी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात कामगार व आंदोलकांचे जमण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे २१ नोव्हेंबर रोजी फाऊंटन परिसरात मोठा जमाव जमला. जोरजोरात घोषणाबाजी सुरू झाली.
जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील सुरू केला पण या प्रयत्नात देखील पोलीस अयशस्वी ठरले. अखेर जमावावर गोळीबार करण्याचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडून पोलिसांना देण्यात आला. पोलिसांनी आदेश पाळत गोळीबार सुरू केला व यात १०६ आंदोलकांनी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आपले प्राण गमावले.
यानंतरही आंदोलने अधिक प्रखरतेने चालू राहिली. सरकारचा निषेध चालू राहिला. १०६ आंदोलक हुतात्मे झाले व मराठी माणसाने शर्तीने लढा दिल्यामुळे सरकारला नमते घ्यावे लागले. सरकारने १ मे १९६० रोजी अखेर मुंबई सहित महाराष्ट्राला स्वतंत्र घोषित केले व आपल्या मराठी माणसाच्या बलिदानामुळे, मराठी माणसांच्या लढ्यामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली. या १०६ आंदोलकांचे आपण कायम स्मरण केले पाहिजे. या आंदोलकांच्या स्मरणार्थ १९६५ साली आंदोलन झाले त्याजागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
महाराष्ट्र दिन कसा साजरा करतात ?
महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातील गावा गावात आनंदाने साजरा केला जातो. यादिवशी भाषण, गायन, परेड, मराठी संस्कृती विषयक कार्यक्रम सार्वजनिक, खाजगी ठिकाणी साजरा केला जातो. राज्य आणि केंद्र सरकारच्या भागात येणाऱ्या शाळा, महाविद्यालये, कार्यालये १ मे रोजी बंद असतात. राज्य सरकार, खाजगी क्षेत्र १ मे रोजी नवीन प्रकल्पांचा शुभारंभ करतात.
मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथे महाराष्ट्र दिन परेड करून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल भाषण करतात. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मराठी माणसाचा महाराष्ट्र दिन मराठी माणूस आनंदाने जपतो, जल्लोषात साजरा करतो, बलिदान कर्त्यांचे स्मरण करतो व महाराष्ट्र भूमीचे मनोमन आभार देखील मानतो. हीच आपली संस्कृती, परंपरा, वारसा पुढे चालू राहावा, महाराष्टाचा इतिहास आजच्या पिढीसहित पुढे रुजावा, महाराष्ट्र दिनाचा इतिहास जपावा व आदर करावा यासाठी प्रत्येक मराठी माणसाने, महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाने प्रयत्न करावेत.
महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा, अभिमान वाटे मला महाराष्ट्र संस्कृतीचा,
इतिहासाचा गंध या संस्कृतीला, वारसा अपूर्व लाभला परंपरेचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याचा अन जिजाऊंच्या संस्कारांचा
संतांच्या अभंगांनी भरलेली, सणासुदिंनी नटलेली, हिरवळीचा साज ल्यालेली, लावणीच्या अविष्कारात न्हालेली
विविधरंगी विविधढंगी सजलेली, गोडव्याने अन चैतन्याने भरलेली, रंगांची बरसात करणारी अशी माझी महाराष्ट्र संस्कृती
महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा, अभिमान वाटे महाराष्ट्र संस्कृतीचा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
©सरिता सावंत भोसले
Comment here