महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे – उन्हाळा म्हणजे भयानक ऊन, वाढती उष्णता,शरीराची होणारी लाही लाही, गरम हवा, वाढते तापमान याने त्रस्त झालेल्या मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांना थंड हवेच्या ठिकाणी काही दिवस फिरायला जावेसे वाटते. त्यात उन्हाळा म्हणजे मुलांना सुट्ट्या असतात. या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी अनेक कुटुंब थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंद करतात पण सगळ्यांनाच महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर जाणे परवडत नाही. (best coolest places in maharashtra during summer)
महाराष्ट्रातही महाबळेश्वर, लोणावळा या ठिकाणी नेहमी जाणे झालेच असेल तर या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील नवीन ठिकाणी नक्की फिरायला जा. काय म्हणता… महाराष्ट्रात आहेत का अशी थंड हवेची ठिकाणे? हो..शंभर टक्के आहेत जिथे जाऊन तुम्ही उन्हाळा विसराल, तुमचे टेंशन्स विसराल, चिंतामुक्त होऊन केवळ तेथील वातावरणाचा आनंद घ्याल, कमी बजेटमध्येही कुटुंबासोबत मनसोक्त फिराल, फॅमिली टाईम चांगला एन्जॉय कराल व पुन्हा पुन्हा तिथे भेट देण्याचा निश्चय देखील कराल. (beautiful places to visit in Maharashtra in the summer)
तर पाहूया उन्हाळ्यात महाराष्ट्रात फिरायला जायची उत्कृष्ट ठिकाणे /पर्यटन स्थळे / थंड हवेची ठिकाणे :-
१) काशीद
खळखळणाऱ्या लाटांचा समुद्रकिनारा, निरव शांतता आणि सुंदर सूर्यास्तासहित रम्य संध्याकाळ अनुभवायची असेल तर महाराष्ट्रातील कोकण भागात वसलेल्या काशीद बीचला नक्की भेट द्या. हिरवा निसर्ग, निळा समुद्र, पांढऱ्या वाळुंचे किनारे, जंगल सफर आणि खाद्यप्रेमींसाठी सीफूड मिळणारे एकमेव उत्कृष्ट ठिकाण म्हणजे काशीद.
निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या या काशीद बीचला दुसरा स्वर्गही म्हंटले जाते. काशीद मध्ये काशीद बीच, रेवदंडा बीच, मुरुड जंजिरा किल्ला, कोरलाई किल्ला, फणसड पक्षी अभयारण्य ही प्रमुख बघण्यासारखी पर्यटन स्थळे आहेत. येथील किल्ल्यांना आवर्जून भेट द्यावी.
काशीद मध्ये स्कुबा डायविंग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, कॅम्पिंग, ट्रेकिंग, केळीच्या बोटी अशा बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. तीन किलोमीटर सोनेरी वाळूने तयार केलेला समुद्रकिनारा आहे त्यावर फिरायला अत्यंत छान वाटते, मनाला शांतता लाभते. बीचवरून सूर्य अस्ताला जाताना बघण्यात अजब सुख आहे. मनातली प्रचंड खळबळ शांत करण्याची ताकद त्या क्षणात आहे.
समुद्रकिनारा असल्याने इथले सीफूड प्रसिद्ध आहे. ज्यांना सीफूड आवडते त्यांच्यासाठी येथील जेवण म्हणजे पर्वणीच असते. त्याचप्रमाणे इथे पोर्तुगीज किल्ले आहेत त्यांनादेखील भेट देऊ शकता. समुद्र, निसर्ग, मासे यासोबत एक ऐतिहासिक वारसा देखील काशीदला लाभला आहे.
शांत,रम्य ठिकाणी भेट देण्यासाठी काशीद हे उत्तम ठिकाण आहे. राहण्यासाठी इथे आसपासच्या गावातदेखील निवासी सेवा उपलब्ध आहेत. आयुष्यात एकदा तरी महाराष्ट्रातील या उत्कृष्ट ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.
हेही वाचा : श्री कांबरेश्वर मंदिर (कांबरे बुद्रुक, ता. भोर)
२) अलिबाग
अलिबाग हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात व भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. अलिबागला महाराष्ट्रातील ‘मिनी गोवा’ असेही म्हंटले जाते. उन्हाळ्यात पर्यटकांच्या इथे रांगा लागतात. अलिबागला तिन्ही बाजुंनी अरबी समुद्राच्या वेढलेले आहे. समुद्रकिनाऱ्याचे नितळ सौंदर्य, स्वच्छ किनारे, प्रसिद्ध खाद्यपदार्थ, येथील किल्ले, वरसोली बीच, मांडवा बीच, आक्षी बीच हे येथील मुख्य आकर्षण आहेत.
अलिबाग इथे अनेक रिसॉर्ट, हॉटेल्स, निवासी व्यवस्था उपलब्ध आहेत जे खिशाला परवडतील. येथील प्रमुख खाणे म्हणजे मासे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. समुद्रातील मासे म्हणजे खाद्यप्रेमींसाठी जन्नतच असते.
फिरण्यासोबतच इथे पॅरासेलिंग,जेट स्कीइंग, बनाना बोट राईड, बम्पी सवारी, कॅम्पिंग, सगर्गद ट्रेकिंग अशा विविध गोष्टी करू शकता. गोव्याला जाणे नाही जमले तरी गोव्याचा आनंद तुम्ही अलिबाग सारख्या प्रसिध्द ठिकाणी अनुभवू शकता.
अलिबागला रेल्वे, बस, गाडीने जाता येते. तसेच गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी बोटदेखील उपलब्ध आहे. अलीकडेच नवी मुंबई (बेलापूर) ते मांडवा बोट देखील उपलब्ध झाली आहे. मांडवा इथून अलिबागला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध असतात. या उन्हाळ्यात नक्कीच अलिबागचा आनंद सहकुटुंब लुटायला विसरू नका.
३) आंबोली
भूगोलात वाचलेच असेल की आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची ६९० मीटर आहे. प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असल्या कारणाने उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात देखील इथे असंख्य पर्यटकांची गर्दी असते. येथील दऱ्या पावसाळ्यात तुडूंब वाहतात. धबधबे बघायला पर्यटकांची गर्दी जमते. उन्हाळ्यात आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण म्हणजे आंबोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उंचावर स्थित असल्याने येथील हवामान नेहमी थंड असते.
माधवगड किल्ला, नंगता पॉईंट, सनसेट पॉईंट, शिरगावकर पॉईंट, आंबोली फॉल्स अशी बरीच मनाला शांतता देणारी ठिकाणे आंबोली मध्ये फिरण्यासारखी आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा आंबोली घाट पर्यटकांचे, निसर्ग प्रेमींचे प्रमुख आकर्षण आहे. जंगल ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांना आंबोली घाट खूप सुंदर ठिकाण आहे. येथील नयनरम्य देखावा, धबधबे, दऱ्याखोरे, नागमोडी वळणे मनाला अशी भुरळ पाडतात की इथे आल्यावर तिथेच रमावे वाटते.
येथील हिरण्यकेशी नदी, पार्वती मंदिर प्रसिध्द आहे. आंबोली जवळ गुहा आहे व या गुहेत सात तलाव आहेत. कावळेशेत पॉईंट पर्यटक आवर्जून बघायला जातात कारण येथील दरीत एखादी वस्तू फेकली तर हवेच्या दाबामुळे ती उलट दिशेने परत बाहेर फेकली जाते. ही जादू पाहण्यासाठी खास पर्यटक इथे गर्दी करतात.
आंबोली घाटावर अशी अनेक आकर्षक ठिकाण आहेत जी आवर्जून बघणे आवश्यक आहे. निसर्गाने मनमोकळेपणाने इथे उधळण केली आहे. राहण्याची व खाण्याची इथे उत्तम सोय आहे तेव्हा आंबोली सारख्या उत्कृष्ट पर्यटन स्थळाला भेट द्यायला या उन्हाळ्यात नक्की जा.
४) मालवण
मालवण या पर्यटन स्थळी जाण्याचे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते. इथला निसर्ग, नारळाची झाडं, समुद्र, मासेमारी बंदर, सनसेट्स, पाणथळ ही आकर्षणे बघण्यासाठी उन्हाळ्यात पर्यटकांची इथे गर्दी असते. मालवण मध्ये बघण्यासाठी अनेक बीच आहेत जसे तारकर्ली बीच, मालवण बीच, चिवला बीच, देवबाग बीच, भोगवे बीच, निवती बीच इथे पर्यटक आवर्जून फिरायला जातात. तसेच छत्रपती शिवरायांचा सिंधुदुर्ग किल्ला मालवणमध्ये जाऊन एकदा अवश्य बघावा.
रॉक गार्डन, गोल्डन रॉक, डॉल्फिन पॉईंट, जय गणेश मंदिर, त्सुनामी आयर्लंड अशी प्रसिध्द ठिकाणे मालवणमध्ये आहेत. पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, जेट स्की राईड, बंपर बोट राईड, स्कुबा डायविंग अशा अनेक ऍक्टिव्हिटीज येथील बीचवर उपलब्ध आहेत.
येथील हॉटेल्समध्ये माशांचे विविध प्रकार खायला मिळतात. तसेच इतर अनेक खाद्यपदार्थांसाठी देखील मालवण प्रसिध्द आहे. राहण्यासाठी कमी बजेटमध्ये देखील येथे होमस्टे उपलब्ध आहेत. तेव्हा बाहेर जाण्यापेक्षा मालवणचे सौंदर्य नक्की पाहायला उन्हाळ्यात जा.
५) रत्नागिरी
दक्षिण महाराष्ट्रात वसलेले रत्नागिरी शहर रत्नागिरी जिल्ह्यातील बंदराचे शहर आहे. कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनाऱ्याचे माहेर म्हणून देखील रत्नागिरीला ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज रत्नागिरीचे शासक होते. रत्नागिरी मध्ये असंख्य अशी प्रेक्षणीय स्थळे, मंदिरे, गडकिल्ले, समुद्र, बीच असल्यामुळे उन्हाळ्यात पर्यटक इथे नक्की येतात. रत्नागिरी मधील अनेक बीच प्रसिध्द आहेत.
भाट्ये बीच, मांडवी बीच, गणेशगुले बीच, गणपती पुळे बीच, मालगुंड, गुहागर बीच, गणपतीपुळे मंदिर, देवगड समुद्रकिनारा, धामापूर तलाव, परशुराम मंदिर, बामणघळ, वेळणेश्वर शिवमंदिर, जयगड किल्ला, रत्नदुर्ग किल्ला अशी अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत जिथे भेट देऊ शकता.
तसेच रत्नागिरी मध्ये अनेक संग्रहालये देखील आहेत. सागरी मत्स्यालय आणि संग्रहालय, थिबा पॅलेस, टिळक अली संग्रहालय जिथे भेट देऊ शकता. पांढरा समुद्र हा रत्नागिरी मधील किनाऱ्यांपैकी लोकप्रिय आहे. चंदेरी वाळू, शांत समुद्रकिनारा, शांत वातावरण यामुळे हा समुद्रकिनारा लोकप्रिय आहे. फिरण्यासोबतच येथील खाद्यपदार्थ देखील प्रसिद्ध आहेत.
येथील प्रत्येक ठिकाणाला ऐतिहासिक आख्यायिका आहे ती जाणून घेण्यासाठी, शुद्ध वातावरणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरीला भेट द्यायलाच हवी. (best places to visit in Maharashtra during summer)
महाराष्टातच स्वर्गासारखी सौंदर्य लाभलेली असंख्य पर्यटन स्थळे आहेत जी आयुष्यात एकदातरी पाहून त्याचा आनंद घ्यायला हवा. नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यापासून क्षणभर विश्रांती साठी, आरामासाठी, मनःशांती साठी उन्हाळ्यात या पर्यटन स्थळांना नक्कीच भेट द्या व तुम्हाला माहित असलेली ठिकाणेही कळवायला विसरू नका.
हेही वाचा : चला वेळणेश्वर फिरायला
जाहिरात : तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा फक्त रु. 1999/- मध्ये
Comment here