आपला भारत देश विविधता व त्या विविधतेतून जन्मास आलेल्या अनेक सणांसाठी प्रसिद्ध आहे. भारतात अनेक धर्मांचे, अनेक प्रकारचे सण वर्षभर साजरे केले जातात. प्रत्येक सणाची खास वैशिष्ट्ये, खास कथा असते. प्रत्येक सण विशिष्ट प्रकारे साजरा केला जातो. वेगवेगळ्या सणांची साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत असते. या सणांमुळेच विविध धर्माचे लोक एकत्र येतात, सण साजरा करतात व एकोपा वाढतो. (why we celebrate Holi Festival)
असाच सप्तरंगांची उधळण करत एकोपा वाढणारा होळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. कोकणात जितक्या उत्साहात होळी साजरी करतात तितक्याच दणक्यात पंजाब मध्येही होळी साजरी होते. भारतातील प्रत्येक राज्यात, भागात होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होत असते. महाराष्ट्रात हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. होळी सण आला की थोरा मोठ्यांकडून ही गोष्ट नक्कीच ऐकवली जाते. ही गोष्ट आहे –
हिरण्यकश्यपू, प्रल्हाद व होलिका यांची गोष्ट
प्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता. तो राजा बलवान होता पण अत्यंत अहंकारी, घमंड खोर होता. त्याहून कोणी दुसरं श्रेष्ठ असू शकत किंवा आहे हे त्याला मान्य नव्हत. सगळ्या देवी देवतांचा तो भयंकर तिरस्कार करायचा. त्यातूनही देवांचा देव विष्णू देवाचे नाव घेणेही त्याला पसंद नव्हते. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद अगदी त्याच्या विरुद्ध होता. प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता. सदैव तो भगवान विष्णूचे नामस्मरण करायचा. हिरण्यकश्यपू राजाला या गोष्टीचा प्रचंड राग यायचा. प्रल्हादला त्याने गोड बोलून समजावून पाहिले, घाबरवून पाहिले, धमकी देऊन पाहिले पण प्रल्हाद मात्र भगवान विष्णूचे नाम घेणं सोडत नव्हता. जितके त्याला भक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न व्हायचा तितकी त्याची भक्ती अतूट होत होती. प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडत नव्हता. अखेरीस याला कंटाळून हिरण्यकश्यपू राजाने एक योजना बनवली.
हिरण्यकश्यपू राजाची बहीण होलिका तिला वरदान मिळाला होता की ती आगीवर देखील विजय मिळवू शकते. अग्नीपासून होलिकेला कोणताही धोका नव्हता. याचाच फायदा घेण्यासाठी हिरण्यकश्यपू राजाने होलिकेला पुत्र प्रल्हादला अग्नीच्या चितेवर बसायला सांगितले जेणेकरून प्रल्हाद त्या अग्नीत भस्मसात होऊन जाईल. ठरल्याप्रमाणे होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसली. प्रल्हाद त्या ही परिस्थिती मध्ये भगवान विष्णूचे नामस्मरण करत होता. काही वेळाने होलिका जळायला सुरुवात झाली. प्रल्हाद मात्र विष्णूच्या भक्तीत लीन होता. या अग्नीमुळे प्रल्हादाला काहीही नुकसान झाले नाही. होलिका मात्र जळून भस्म झाली. भगवान विष्णू यांनी आपला परमभक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होते. या आनंदात तेव्हापासून लोक होळी साजरी करतात अशी कथा आहे.
होलिकेला अग्नीपासून धोका नसण्याचे वरदान मिळाले होते पण तिने त्या वरदानाचा चुकीचा वापर केला, चुकीच्या हेतूसाठी वापर केला म्हणून अखेर तिचाच अंत झाला. होळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊन फक्त चांगले व्हावे अशी प्रार्थना होळी दहन करताना करतात.
दुसरी एक कथा आहे राधा कृष्ण यांची
ज्यावेळी एका राक्षसीने श्रीकृष्णाला विषारी दुध पाजले होते त्यावेळी त्या विषामुळे श्रीकृष्णाचा रंग निळा झाला होता. आता या रंगामुळे राधा व इतर गोपिका आपल्याशी बोलतील का की घाबरतील की कायमच्या दुरावतील अशी भीती श्रीकृष्णाला वाटत होती व ही भीती माता यशोदेला त्यांनी बोलून दाखवली. यावर माता यशोदाने श्रीकृष्णाला सल्ला दिला की असे काहीही होणार नाही. जो रंग तुला आवडतो तोच राधाला लावून ये आणि मातेचे ऐकून श्रीकृष्णांनी खरंच राधेला रंग लावला व त्या दिवसापासून त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली व तेव्हापासून होळी खेळण्याची, साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असे म्हणतात.
होळी कशी साजरी करतात ?
होळीबाबत विविध कथा विविध भागात प्रचलित आहेत पण होळीचा सण आनंदाने सगळीकडे साजरा होतो. होळीच्या पहिल्या दिवशी लाकडे, गोवऱ्या गोळा करून होळी उभी करतात. बऱ्याच ठिकाणी विशेषतः कोकणात रांगोळी काढून, पताके लावून होळी सजवली जाते व देवाचे स्मरण करून होळी पेटवली जाते. कोकणात या सणाला शिमगा असेही म्हणतात. शिमगा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाच ते पंधरा दिवस कोकणात शिमगा साजरा होतो. या दिवसांमध्ये प्रत्येक गावातील देवांची पालखी काढली जाते.
होळी उत्सवात कोकणात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डेरा नृत्य, जाखडी नृत्य, कातखेळ, गौरीचा नाच, चवळी नृत्य, शंकासुर, सवाल जवाब,गाऱ्हाणी यांसारखे अनेक कार्यक्रमाचे सादरीकरण उत्साहात होते. तिखट व गोड नैवेद्य देवी देवतांना दाखवला जातो. कोळी समाज , समुद्रकिनारी राहणारे मासेमारी व्यवसाय करणारे या काळात समुद्राची पूजा करतात. त्यानंतर पारंपरिक गाणी, नृत्य,जेवण असा कार्यक्रम करून होळी साजरी करतात.
पश्चिम महाराष्ट्र व इतर भागात देखील होळीच्या पहिल्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करून पुरणपोळीचा नैवेद्य होळीला अर्पण केला जातो. होळीभोवती बोंब मारली जाते . (वाईटाचा नाश होऊन चांगलं व्हावं हाच उद्देश असतो) वाईट वृत्तीने, वाईट गोष्टी, दृष्ट विचार, दृष्ट प्रवृत्ती यांचा नाश होऊन सुखी, आनंदी जीवनासाठी, शुभ कार्यासाठी, चांगल्या प्रवृत्ती साठी होळी समोर प्रार्थना केली जाते. होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो. अशा प्रकारे होळीचा पहिला दिवस सगळ्या भागांत होलिकादहन करून साजरा करतात.
धुलिवंदनाचा दिवस
होळीचा दुसरा दिवस असतो धुलिवंदनाचा. या दिवशी ठिकठिकाणी एकमेकांना रंग, गुलाल लावून धुलीवंदनाचा आनंद घेतला जातो. सप्तरंगांची उधळण केली जाते. सगळ्या रंगांत न्हाऊन रंगाचा सण साजरा केला जातो. धुलिवंदनला धुळवड असेही म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रात पाच दिवसांनी रंगपंचमी या दिवशी रंगांचा खेळ खेळला जातो. अशा पद्धतीने भारतात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुम्हीही सगळ्या रंगांत न्हाऊन होळी साजरी करा पण स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. (Holi Festival information in marathi)
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Comment here