सकाळी दुपारी संध्याकाळी अशा त्रिकाळी स्त्रियांना पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय करू? जेवणाला काय करू? आज कोणती भाजी बनवू? ही भाजी मुलगा खात नाही, अमुक भाजी मुलीला आवडते तर इतर जण नाक मुरडतात. एकाला एक एकाला वेगळे असे करून करून तरी किती करणार ? त्याच त्याच भाज्यांचाही घरात कंटाळा येतो. रोज डब्याला न्यायला वेगळं काहीतरी हवंच.
घरच्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेवत आणि जपत स्वतःला काय आवडतं हेही स्त्रिया विसरलेल्या असतात. तर मूळ मुद्दा काय की रोज नाश्ता किंवा जेवणात वेगळं काय बनवू? नावडत्या भाज्याही पोटात जातील, पोटही भरेल व पौष्टिक अन्नही मुलांना मिळेल असे पदार्थ रोज वेगवेगळे काय बनवू? तर काहीतरी वेगळं पण पौष्टिक आणि पटकन होणाराही पदार्थ म्हणजे पराठे. निरनिराळ्या भाज्यांचे पराठे जरा वेगळ्या स्टाईलने केले की मुलंही आवडीने खातात आणि आपलेही पोट भरतेच. आज वेगवेगळ्या प्रकारचे पराठे पाहूया:-
बीट पराठे
दोन किंवा तीन बीट कुकर मधून शिजवून घ्यावे. (आवडत असल्यास यात बटाटेही घालू शकता). गरम तेलात जिरे, कडीपता, मिरची किंवा लाल तिखट ( आवडीनुसार) ,धने जिरे पावडर, बडीशेप, चवीनुसार मीठ, हळद घालून त्यात crush केलेला बीटाचा किस टाकून मिश्रण चांगले परतावे. वरून कोथिंबीर घालावी. हे सारं थंड झाले की गव्हाच्या कणिकेच्या उंडयात भरून पराठा लाटावा. (पुरणपोळी प्रमाणे) . गरम तव्यात तूप लावून खरपूस भाजून सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करावा. सहसा बीट खाण्याचा कंटाळा केला जातो किंवा आवडत नाही पण याचे पौष्टिक फायदे शरीराला खूप असतात म्हणून हा बीट पराठा मुलांसाठी, स्वतःसाठी नक्की बनवून बघा.
पालक पराठे
पालक शिजवून घ्यावा किंवा तसा आवडत नसल्यास पालकाची पाने, लसूण, जिरे, मिरची मीठ, आवडल्यास गरम मसाला हे सगळे साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेणे. या मिश्रणात गव्हाचे पीठ, बेसन ( यात थोडे बाजरी, ज्वारीचे पीठ ही घालू शकता) हळद घालून पीठ चांगले घट्ट मिळून घ्यावे. दहा मिनिटे झाकून ठेऊन नंतर पराठा लावून तेल किंवा तूप वापरून खरुस भाजून घ्यावा. या पराठ्या मध्ये पनीर खिसून घातल्यास पालक पनीर पराठा चविष्ट होतो.
फ्लॉवर / गोबी पराठे
फ्लॉवर नीट निवडून किसून किंवा बारीक चिरून घ्यावा. किसलेल्या फ्लॉवर मध्ये तिखट, मीठ, ओवा, जिरे, धणे पूड, गरम मसाला किंवा किचन किंग मसाला ( मसाले आवडीप्रमाणे घालावेत. पावभाजी मसालाही वापरू शकता) घालून मिश्रण बनवावे. हे मिश्रण नेहमीप्रमाणे कणिकेच्या गोळ्यात/ उंडयात भरून पराठा लाटून भरपूर तेल/ तूप सोडून खरपूस भाजुन घ्यावा. हा पराठा लसूण चटणी, सॉस, लोणचं यासोबत उत्कृष्ट लागतो. फ्लॉवर भाजी आवडत नसल्यास त्याचा पराठा केव्हाही उत्तम.
मिक्स पराठा
कोबी, फ्लॉवर, गाजर, बीट, भोपळा भाज्या किसून घेणे. भाजणीचे पीठ म्हणजे गहू, बाजरी, ज्वारी, बेसन, तांदूळ पीठ अशी पीठे एकत्र करून त्यात वरील किसलेल्या भाज्या घालाव्यात. (जी पीठ उपलब्ध असतील ती घेतली तरी चालेल). वरील साहित्यात मीठ, ओवा, जिरे, तीळ, धणे जिरे पूड, तिखट, गरम मसाला, मिरची, हळद एकत्र करून पीठ मळून घेणे. पराठे लाटून तूप/ तेल वापरून खरपूस भाजून गरम गरम खावे. स्वादिष्ट अशी हे पराठे होतात.
मटार पराठे
मटार वाफवून घ्यावेत किंवा कच्चे मटार मिक्सरमधून बारीक केले तरी चालतील. एक बटाटा वाफवून किसून घ्यावा.मटार बटाटा मिश्रणात तिखट, मीठ, ओवा, जिरे धणे पूड, चाट मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला (ऑप्शनल) घालावा. भाजणी किंवा गव्हाच्या पिठाचे गोळे करून त्यात वरीलमिश्रणाचे सारण भरून पराठा लाटून घ्यावा. तूप किंवा तेल सोडून पराठा खरपूस भाजून घ्यावा.
टीप :- सारण पातळ होऊ नये यासाठी मटार, बटाटा जास्त वाफवू नये. सारण आणि पारीचे पीठ (कणिक) सारख मऊ असावे.
असेच वेगवेगळे भाज्यांचे पराठे बनवल्यास नावडत्या भाज्याही पोटात जातात व पौष्टिक पदार्थ आवडीने खाल्ले जातात. हे पराठे नक्की ट्राय करून बघा. तुमच्याकडेही वेगळ्या रेसिपी असल्यास शेअर करु शकता.
[…] हेही वाचा : ५ प्रकारचे पौष्टिक पराठे […]
[…] हेही वाचा : ५ प्रकारचे पौष्टिक पराठे […]